खान्देशनी बातमी ! खानदेशच्या रणात निष्ठेहून सत्तेची ऊब भारी

Uttar Maharashtra News | दिग्गजांची अजित पवार गटाशी सलगी
नाशिक
शरद पवार यांना गुडबाय म्हणत डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या जळगावकर जोडगोळीसह तीन माजी आमदार अजित पवार गटाच्या पालखीचे भोई बनले आहेत.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: मिलिंद सजगुरे

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’, या म्हणीची प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबाबत खान्देशात येत आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांत दारूण आपटी खाल्ल्यानंतर या पक्षाचे नेते इतरत्र स्वत:चे राजकीय बस्तान बसवू पाहत आहेत. ज्यांच्या कृपाद़ृष्टीमुळे मंत्रिपदाचा साज चढला, त्या शरद पवार यांना गुडबाय म्हणत डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या जळगावकर जोडगोळीसह तीन माजी आमदार अजित पवार गटाच्या पालखीचे भोई बनले आहेत. या घडामोडीमुळे जळगावमधील राजकारण मात्र ढवळून निघणार आहे.

अजितदादांचे बेरजेचे राजकारण

जळगावमधील विधानसभेच्या सर्व अकरा जागांवर महायुतीचा झेंडा फडकला असला तरी अमळनेरला दादा गटाचे अनिल पाटील वगळता उर्वरित ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे निवडणूक निकालात वर्चस्व राहिले. राजकीयद़ृष्ट्या सबलता प्राप्त करायची असेल तर बड्या नेत्यांना सामावून घेण्यावाचून तरणोपाय नाही, हे अजित पवार जाणून आहेत. त्याच अनुषंगाने विविध आरोपांची झालर असली आणि स्थानिक नेत्यांना नकोसे असले तरी बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन डॉ. पाटील-देवकर जोडीसह माजी आमदारांना पक्षप्रवेश देण्यावर अजितदादांनी शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.

जळगावच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून भाजपचा दबदबा असला तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. डॉ. पाटील आणि देवकर त्यापैकीच ज्ञात चेहरे आहेत. लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या अकराही जागा सत्ताधार्‍यांनी लिलया खिशात घातल्यानंतर महाविकास आघाडीत जिल्ह्यापुरता मोठा भाऊ असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला नैराश्याने घेरले आहे. जिल्हा बँक राजकारणापासून प्रत्येक निवडणुकांत स्वत:ला चर्चेत ठेवणार्‍या पाटील-देवकर जोडीसह दिलीप वाघ, दिलीप सोनवणे आणि कैलास पाटील या माजी आमदारांना वेगळा राजकीय प्रयोग करण्याचे डोहाळे लागले. भाजप अन् शिंदेंच्या शिवसेनेत आधीच भाऊगर्दी असल्याने या मंडळीने आपला मोर्चा आपसूकच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे वळवला. अजित पवारांनीही जिल्ह्यात दमदार चेहर्‍यांची गरज असल्याने त्यांना सामावून घेताना कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत, हे विशेष. मोठ्या पवारांच्या तालमीत घडलेला हा गोतावळा दादांच्या पालखीचा भोई बनला.

वस्तुत: डॉ. पाटील, देवकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे चर्चेतले चेहरे खान्देशात शरद पवारांसाठी खिंड लढवत होते. पैकी फडणवीस-महाजन यांच्या प्रखर विरोधामुळे नाथाभाऊंचा भाजप पुनप्रर्वेश रखडल्याने त्यांना तूर्त पवारांसोबत राहण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागत आहे. म्हणूनच पाटील-देवकरांसह तीन माजी आमदारांच्या बाहेर जाण्याने शरद पवारांचा पक्ष पोरका झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाध्यक्ष म्हणून पवार नेमका काय पवित्रा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाशिक
जळगावच्या दोन माजी मंत्र्यांसह तीन माजी आमदारांनी सोडली शरद पवारांची साथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news