

मुंबई/जळगाव : विकासकामे करवून घ्यायची असतील, तर सत्तेवाचून तरणोपाय नसल्याची भावना व्यक्त करीत राष्ट्रवादी शरद पवार गटातील जळगावच्या बड्या नेत्यांनी शनिवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या माजी मंत्र्यांसह माजी आमदार, तसेच पदाधिकार्यांनी पक्ष प्रवेश केला. शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुंबईत शनिवारी के. सी. कॉलेज सभागृहामध्ये झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात डॉ. पाटील आणि देवकर यांच्याशिवाय माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी अजित पवार यांच्यासमवेत जाण्यावर शिक्कामोर्तब केले. याव्यतिरिक्त जळगाव, धुळे, रावेर, नंदुरबार आदी ठिकाणच्या माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक संचालक, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकार्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. पक्षाध्यक्ष अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.