

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव हा संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा उत्सव असून, त्याला व्यसनाधीनतेचे स्वरूप येता कामा नये. दारू, ड्रग्ज अथवा नशा करणाऱ्या व्यक्तींना मंडळांनी मिरवणुकीत सहभागी करून घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
यावेळी आ. देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर - आडके, खा. राजाभाऊ वाजे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गणेश उत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गजानन शेलार, शाहू खैरे, विनायक पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक प्रास्ताविकात म्हणाले की, नाशिक शहरातील गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी गणेश मंडळे आणि नागरिकांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी शहरात ८८४ सार्वजनिक गणेश मंडळे आणि १ लाख ४४ हजार घरगुती गणेशमूर्तींची स्थापना झाली होती.
पर्यावरणपूरक मूर्ती, निर्माल्य व्यवस्थापन, ध्वनिक्षेपकांच्या मर्यादांचे पालन आणि वाहतूक शिस्तीचे मंडळांनी काटेकोरपणे पालन केले. 'ड्रग्जफ्री नाशिक', महिला व बालक सुरक्षा, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती आणि रस्ता सुरक्षेसारख्या सामाजिक विषयांवर मंडळांनी प्रभावी संदेश दिले. विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, स्वयंसेवकांची नियुक्ती आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांनी गणेश मंडळांचे आभार मानले.
पारितोषिक विजेत्या तसेच सहभागी सर्व मंडळांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी कुंभमेळ्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
पालकमंत्री महाजन म्हणाले की, नाशिकची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा वेगळी आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या कुंभनगरीतील गणेशोत्सवही शिस्तबद्ध आणि संस्कृतीला साजेसा असावा. आपण स्वतः कार्यकर्ता म्हणून गणपती, दुर्गेत्सव, दहीहंडी यांसारख्या उपक्रमांतून पुढे आलो.
सामाजिक कार्य करणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही नेतृत्वाची क्षमता असून, त्यांनी समाजासाठी चांगले काम करावे, असे त्यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ३५ ते ४० हजार कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. आऊटर रिंग रोड, रस्ते, भुयारी गटारे आणि गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी एसटीपी प्रकल्प सुरू आहेत.
कुंभमेळा प्राधिकरणामार्फत गणेश मंडळांसाठी पर्यावरण, तंत्रज्ञान, आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर स्पर्धा घेऊन बक्षीसे देण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या ध्वनि नियमांचे पालन करून उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन महाजन यांनी केले.
आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील भूमिगत वीजवाहिन्यांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. मागील दोन वर्षांत सुमारे सात - आठ कोटींच्या निधीतून या कामाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी क्रॉसिंग व नागरिकांच्या विरोधामुळे काम रखडले आहे.
पोलिसांच्या सहकार्याने ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मिळालेल्या निधीतून नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून, 'आपलं नाशिक, आपला कुंभ आणि आपलाच गणेशोत्सव' हा संदेश मंडळांनी द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या समारंभास पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, प्रमोद वाघ, डॉ. सचिन बारी, मोहन रेड्डी, अद्विता शिंदे यांच्यासह सर्व १३ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
महावितरणने गणेश मंडळांकडून घेतलेली वीज डिपॉझिटची रक्कम परत करावी तसेच गणेशोत्सव कालावधीत मंडळांना वीजबिल आकारू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. उत्सव काळात हॉटेल व गणेश देखावे रात्री १२ पर्यंत नागरिकांसाठी खुले ठेवण्यास परवानगी द्यावी. मिरवणूक मार्गावरील विजेच्या तारा तातडीने काढाव्यात तसेच शासन किंवा प्रायोजकांच्या माध्यमातून गणेश मंडळांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या उपस्थित मान्यवरांकडे करण्यात आल्या.
परिमंडळ १: प्रथम क्रमांक श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, द्वितीय क्रमांक वेलकम सहकार्य मित्रमंडळ, तृतीय क्रमांक (संयुक्तपणे विभागून), सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी, नाशिक., जय शिव बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, पंचवटी, उत्तेजनार्थ : नाशिकचा राजा सूर्यप्रकाश, नवप्रकाश कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रमंडळ, घनकर लेन, न्यू स्फूर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ नाशिकचा चिंतामणी.
परिमंडळ- २: नाशिक मधील पारितोषिक विजेते गणेश मंडळे, प्रथम क्रमांक : श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ, श्रद्धा विहार, वडाळा-पाथर्डी, नाशिक, द्वितीय क्रमांक: आयएसपी, सीएनपी, वेलफेअर फंड कमिटी, नाशिकरोड. तृतीय क्रमांक (संयुक्तपणे विभागून), साई रुद्रा बहुउद्देशीय संस्था साई रुद्राचा राजा गणेश मंडळ, अशोकनगर, ईगल स्पोर्ट्स अँड सोशल क्लब विजयलक्ष्मी चेंबर, आर्टिलरी सेंटर रोड, अनुराधा टॉकीज, नाशिकरोड. उत्तेजनार्थ: ओमकार कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक सांस्कृतिक मंडळ, उपनगर, शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था, देवळाली कॅम्प.