

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत लासलगावहून दिल्लीच्या आदर्श नगरकडे ४५० मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली विशेष 'कांदा एक्सप्रेस' प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख गणेश निंबाळकर यांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन करून अडवली.
कांदा खराब व नासका असून, त्याची गुणवत्ता तपासल्याशिवाय रेल्वे रवाना करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने सुमारे पाऊण तास रेल्वे वाहतूक खोळंबली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना रुळावरून हटवल्यानंतर दुपारी ३ ला कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली.
दिल्लीतील कांद्याचे वाढते बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार लासलगावहून दिल्लीला 'कांदा एक्सप्रेस' सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ८४० मेट्रिक टन कांदा पाठवण्याचे नियोजन असताना प्रतवारी आणि ४० किलोच्या गोण्यांमध्ये पॅकिंगचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने प्रत्यक्षात केवळ ५०० मेट्रिक टन कांदाच रेल्वेने रवाना झाला. त्यामुळे नियोजित क्षमतेपेक्षा ३४० मेट्रिक टन कांदा कमी पाठवला गेला.
लासलगाव रेल्वेस्थानकात सोमवारी रात्री ११.५० वाजता २१ बोगींची मालगाडी दाखल झाली होती. नियोजनानुसार मंगळवारी सकाळी ७ वाजता ही गाडी दिल्लीसाठी रवाना होणे अपेक्षित होते.
मात्र, गोदामातील कांद्याची प्रतवारी, पॅकिंग आणि लोडिंगची प्रक्रिया मंथ गतीने झाल्याने अखेर ५०० टन कांदा लोड झाल्यानंतर बुधवारी दुपारी ३.१० वाजता गाडी मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती लासलगाव रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर प्रीतेश दुबे यांनी दिली. दिल्लीच्या आदर्शनगर स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी या एक्सप्रेसला अंदाजे २२ ते २४ तासांचा कालावधी लागणार आहे.
३४० टन कांदा कमी; वाहतूक नियोजनावर प्रश्न
एनसीसीएफमार्फत १,२३५ ते २,३४५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेला कांदा नाशिक जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये बफर स्टॉक म्हणून साठवण्यात आला होता. या साठ्यातून ८४० टन कांदा दिल्लीला पाठवण्याचे निर्देश होते. मात्र, प्रत्यक्षात ५०० टनच पाठवल्याने तब्बल ३४० टन कांदा कमी गेला आहे. कांद्याचे प्रमाण कमी असतानाही २१ बोगींची रेल्वे वापरण्यात आल्याने प्रतिटन वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
विलंबामुळे रेल्वे डिटेंशन शुल्काचा भुर्दंड?
कांदा एक्सप्रेस निर्धारित वेळेपेक्षा तब्बल ३२ तास अतिरिक्त स्थानकात थांबल्याने रेल्वेकडून डिटेंशन शुल्क आकारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध अंदाजानुसार प्रतिबोगी सुमारे १५० रुपये प्रतितास शुल्क गृहीत धरल्यास २१ बोगींसाठी सुमारे एक लाख आठ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो.
कांद्याच्या गुणवत्तेवरून 'प्रहार'चे आंदोलन
कांद्याच्या गुणवत्तेवरून या विशेष रेल्वेला प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख गणेश निंबाळकर यांनी विरोध केला. निकृष्ट व सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असून, केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने ठरवलेल्या निकषानुसार दर्जादार कांदा पाठवला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. 'निकृष्ट कांद्याला कांदा एक्सप्रेसचे नाव कसे देता?' असा सवाल करत त्यांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला.
कांदा एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवर घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाडी मागे घेण्यास सुरुवात केली असतानाही निंबाळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत गाडी दिल्लीला जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे एनसीसीएफ, केंद्रीय वखार महामंडळाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक वाद झाला.
परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक रोहित कुमार यांनी लासलगाव पोलिसांची मदत मागितली. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, दिनकर मुंडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. निफाडचे पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनीही अतिरिक्त कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.