

Kamayani Express Engine Fire near Igatpuri
इगतपूरी : मुंबईहून बलियाच्या दिशेने जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनला शनिवारी दुपारी आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक खोळंबली आहे.
शनिवारी दुपारी कामायनी एक्सप्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटली. इगतपूरीजवळ इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला आणि इंजिनखालून धूर येत होता. हा प्रकार इंजिन चालकाला लक्षात आला आणि त्याने तातडीने एक्स्प्रेस थांबवली. धूर येताच एक्स्प्रेस थांबल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रवाशांनीही दाखवलेले संयम आणि चालकाचे प्रसंगावधान यामुळे अनर्थ टळला.
या सगळ्या गोंधळात कामायनी एक्स्प्रेस तब्बल पाऊण तास एकाच जागेवर थांबली होती. यामुळे वीक एंड आणि त्यातही ऐन संध्याकाळच्या वेळेस मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला.