

दिंडोरी : नाशिक-कळवण राज्य महामार्गावरील फोरलेन रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. काम करणारी यंत्रणा आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना बसत आहे. विशेषतः आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते अक्राळे फाटा या दरम्यानचा रस्ता खोदला असून, पर्यायी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे हा मार्ग नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. रोज नोकरीसाठी ये-जा करणारे कर्मचारी, विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच इतर प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, तर चारचाकी वाहनेही चिखलात अडकत असून, अपघातांची संख्या वाढत आहे.
दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका महिलेचा पाय कापावा लागला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षित पर्यायी मार्ग, वाहतूक व्यवस्था, इशारा फलक, पुरेशी प्रकाशयोजना आणि चिखलमुक्त रस्ता उपलब्ध करून देणे ही ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून चिखल हटवावा, पर्यायी रस्ते सुरक्षित करावेत, खड्डे बुजवावेत, इशारा फलक लावावेत आणि रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.