Kalwan Constituency | दिर-भावजयीचा कळवण मतदारसंघ ढासळला, लाल वादळाचा प्रभाव कायम

Kalwan Constituency | दिर-भावजयीचा कळवण मतदारसंघ ढासळला, लाल वादळाचा प्रभाव कायम

सुरगाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल जनतेच्या अपेक्षेप्रमाणे लागला. भाजपच्या माजी खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करत इंडिया आघाडी पुरस्कृत शरद पवार गटाचे भास्कर भगरे निवडून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार आणि कळवण विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार नितिन पवार हे दोघे नात्याने दीर-भावजय. भावाजय आणि भाजपची जागा निवडूण आणण्यासाठी दिलजमाई करून दोघांचे मनोमिलन घडवून आणले. परंतु ही दिलजमाई मतदारांनी निष्फळ ठरविली.

दिंडोरीत कुणाला किती मते?

  • डॉ. भारती पवार (महायुती) – 4,64,140
  • भास्कर भगरे (महाविकास आघाडी) – 5,77,339
  • बाबू भगरे (अपक्ष) – 103632
  • नोटा – 8246
  • तब्बल 1,13,199 मतांनी आघाडी घेत भास्कर भगरे विजयी

पाच वर्ष मतदारसंघाच्या खासदार असताना मतदारसंघातील जनतेकडे पुर्णतः पाठ फिरवली. मतदार आणि कार्यकर्ते याच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही. आरोग्यमंत्री असतांना सबंध मतदारसंघात आरोग्यविषयक कोणतीही सुविधा केली नाही. नाफेडचे शेतकरी विरोधी कारस्थान , उर्मठ भाषाशैली आणि सातत्याने नाशिक दिल्लीचा मुक्काम यामुळे मतदार संघ वाऱ्यावर सोडला गेल्याची नागरिकांची भावना झाली होती. सासर आणि माहेर कळवणचे असूनही गाव व तालुक्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले. यामुळे भारती पवारांना पराभवाची किंमत मोजावी लागली.

जनतेने स्पष्ट नाकारले

नितीन पवार हे स्वतः कळवण सुरगाण्याचे आमदार आहेत. मात्र त्यांच्या कार्यावर सबंध मतदारसंघ नाराज असल्याचे त्यांच्या शब्दाला मतदारांना स्पष्टच नाकारले. आमदार झाल्यावर ऑनलाईन उद्घाटनांचा धडाका लावला, परंतु ती तशीच रेंगाळत पडली, मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले. वनाधिकार कायद्याविरोधात भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉटधारकांच्या विरोधातील भूमिका घेतली. विकासकामांकडे दुर्लक्ष्य केले. त्यामु‌ळे दिर-भावजय यांना जनतेने स्पष्ट नाकारले.

———–

विजयाचा कळस लाल वादळानेच बनला

दोघेही सत्ताधारी असताना कळवण सुरगाणा मतदारसंघातून जेमतेम पंचावन्न हजार मते मिळाली. याउलट माजी आमदार तथा शेतकरी नेते जे. पी. गावीत यांचा प्रभाव यावेळीही जास्तच दिसला. २०१९ च्या निवडणुकीत ८० हजार मते मिळविलेले गावीत आपली मते टिकवण्यात यशस्वी झाले. मतदारसंघातील जनतेशी जोडलेली नाळ, कार्यकर्त्यांची विश्वासू फळी, जनतेच्या सुखदुःखातील जनसंपर्क, शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव आणि शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे प्रश्न हाती घेउन उभारलेली आंदोलने, फॉरेस्ट प्लॉटच्या अंमलबजावणीसाठीचे मुंबईपर्यंतचे लढे यामुळे त्यांचा मतदारसंघातील प्रभाव कायम राहिला आहे. जे. पी. गावीत यांचे एकगठ्ठा मतदान आणि इतर पक्षांनी मिळून एक लाख चौदा हजार मते भास्कर भगरे यांना मिळाल्याने गावीत यांचा कळवण विधानसभा मतदारसंघावरील प्रभाव स्पष्ट दिसतो. सबंध दिंडोरी मतदार संघातील शेतकरी, बागायतदार, शेतमजुर, कामगार, नोकरदार यांच्या प्रश्नांचा पुढाकार घेणाऱ्या गावितांनी आपली दीड लाख मतांची ताकद दाखवुन दिली आणि विजयाचा कळस लाल वादळानेच बनला हे दाखवुन दीले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गावीत यांचे संघटन, जनसंपर्क , विकासकामे आणि खासदार भगरे यांना मिळवून दिलेली लाखोंची मते ही जमेची बाजू ठरणार यात तिळमात्र शंका नाही.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news