

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी (दि. ११) प्रारंभ होत असून, विविध देवीमंदिर आणि मंडळांमध्ये घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य, मातीचे घट, फुले, हार, पूजेची भांडी आणि सजावटीच्या वस्तूंसह घरोघरी घटस्थापनेची तयारी होत आहे. शक्तीची उपासना, साधना आणि जागाराच्या शारदीय नवरात्रोत्सव स्वागतासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
येथील प्रसिद्ध कालिकामाता मंदिरात नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेची आणि कायदा - सुव्यवस्था राखण्याची खबरदारी म्हणून मंदिर परिसर एकूण ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिर व मुख्य कळसावर रोषणाई केली असून, मंदिर आवारातील दीपमाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भाविकांसाठी वॉटरप्रूफ सभामंडप, प्रसादानासाठी २५ स्टॉल आणि जनरेटरची व्यवस्था केली आहे. सत्यसाई सेवाभावी संस्थेने विनामूल्य सेवासुविधा पुरविली आहे. रविवारी (दि. ११) घटस्थापनेनंतर नऊ दिवस महाआरती, भजन - कीर्तनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
यामध्ये महिला भजनी मंडळाकडून देवीच्या चरणी सेवा अर्पण केली जाणार आहे. नऊही दिवसांत दररोज रात्री ११.३० वाजता सुमारे पाऊण तासाची आरती होणार आहे. भाविकांच्या सोयीनुसार देवीचे दर्शन घेता यावे, त्यासाठी संपूर्ण नऊ दिवस मंदिर २४ तास खुला ठेवण्यात येणार आहे.
भाविकांना ५ कोटींचे विमा कवच
कालिकामाता संस्थानतर्फे मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच कोटी रुपयांचा अपघाती विमा काढला aहे. या निर्णयामुळे भाविकांना सुरक्षा कवच मिळणार आहे. धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संस्थानने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
घटस्थापनापूजन
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापना करून कुलस्वामिनीचे विधिवत पूजन केले जाते. या पूजेला आचमन, प्राणायाम आणि इष्टदेवतांच्या स्मरणाने सुरुवात होते. त्यानंतर नाव, गोत्र आदींचा उल्लेख करून नवरात्रोत्सवाचा संकल्प करण्यात येतो. अखंड दीप प्रज्वलित करून दीपपूजन, तसेच शंख व घंटेचे पूजन केले जाते. घटस्थापनेसाठी कलशात पवित्र जल, सुपारी, नाणे आदी पूजासाहित्य ठेवून वरुणदेवतेचे आवाहन केले जाते.
घाटाभोवती मातीमध्ये सात धान्यांची पेरणी केली जाते. त्यानंतर आपापले कुलस्वामिनीपूजन करावे. त्यानंतर देवीची आरती करून मंत्रपुष्पांजली अर्पण करावी, असे ज्योतिषाचार्यांनी शास्त्रोक्त पूजाविधी सांगितली. परिसरात ५० हून अधिक सुरक्षाक्षक, सीसीटीव्ही, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांग आणि दर्शनमार्गावर मंडपाची व्यवस्था केली आहे.
भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजिया, विश्वस्त किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, आबा पवार, विशाल पवार, दत्ता पाटील तसेच कालिकादेवी भक्त मंडळाने केले आहे.
कुमारिका पूजनाला विशेष महत्त्व:स्कंद पुराणात देवीच्या व्यानुसार कुमारिकांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्यानुसार दोन वर्षांच्या कन्येला 'कुमारी', तीन वर्षांच्या कन्येला 'त्रिमूर्तीनी', चार वर्षांच्या कन्येला 'कल्याणी', पाच वर्षांच्या कन्येला 'रोहिणी', सहा वर्षांच्या कन्येला 'काली', सात वर्षांच्या कन्येला 'चंदिका', आठ वर्षांच्या कन्येला 'दुर्गा' आणि नऊ वर्षांच्या कन्येला 'सुभद्रा' असे संबोधले जाते. नवरात्रोत्सवात कुमारिका पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
डॉ. नरेंद्र धारणे (ज्योतिष-धर्मशास्त्र तज्ज्ञ)
"अष्टमीला देवीची विविध प्रकारे उपासना केली जाते. स्तोत्रपठन, पूजन आणि भक्तिभावाने केलेली उपासना यातून नऊ दिवस देवीप्रति श्रद्धा and शक्तीची आराधना करण्यात येणार आहे."
— डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष-धर्मशास्त्र तज्ज्ञ