

नाशिक : निखिल रोकडे
देशभरात नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, गैरव्यवहार आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाविरोधात संताप उसळला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक रूप धारण केले आहे. दगडफेक, घोषणाबाजी, संघर्ष यामध्ये एक चेहरा मात्र शांतपणे उभा आहे. हातात एकच फलक... 'जस्टिस फॉर यश' त्या फलकावर एक नाव आहे, पण त्यामागे लाखो विद्यार्थ्यांच्या तुटलेल्या स्वप्नांचा निःशब्द हुंदका दडलेला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथील यश अशोक गोसावी हा युवक डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होता. यशने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवले होते. एमबीबीएस हेच त्याचे अंतिम ध्येय होते. पर्याय म्हणून त्याने बीएचएमएसमध्ये प्रवेश घेतला होता, पण मनात एकच स्वप्न होते 'डॉक्टर व्हायचं.' मात्र नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, त्यानंतरचा गोंधळ आणि पुन्हा परीक्षा देण्याची वेळ यामुळे त्याच्या मनावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला. २१ जून रोजी पुन्हा परीक्षा होणार होती.
त्याच्या आदल्या दिवशी, २० जूनला, घरात आनंदाचे वातावरण होते. वडिलांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्यामुळे यशसह त्याचा भाऊ अनिकेत या दोघांनी वडिलांचे अभिनंदन केले. कुणालाही कल्पना नव्हती की, काही तासांत हेच घर कायमच्या शांततेत बुडून जाईल. दुपारी यशने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून, वागण्यातून अशा निर्णयाची चाहूलही कुणाला लागली नव्हती.
आज देशात या प्रकरणावर राजकारण होईल, चौकशा होतील, दोषांवर कारवाई होईल, नवीन नियम बनतील, परीक्षा व्यवस्थेत सुधारणांची आश्वासने दिली जातील. पण, या सगळ्या निर्णयानंतरही गोसावी कुटुंबाचा यश परत येणार नाही. एका आईच्या कुशीतला मुलगा, एका वडिलांच्या आयुष्याचा अभिमान आणि एका भावाचा जिवलग मित्र कायमचा निघून गेला आहे.
तर भाऊ अनिकेत आज आंदोलनात घोषणा देत नाही. तो राग व्यक्त करत नाही. तो फक्त हातात 'जस्टिस फॉर यश' असा फलक घेऊन उभा राहतो. त्या फलकात त्याच्या भावाची आठवण आहे, आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची भीती आहे. त्या शांततेतही हजारो घोषणांपेक्षा मोठा आवाज दडलेला आहे.
स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ प्रश्नपत्रिका नसते; ती लाखो कुटुंबांची वर्षांनुवर्षांची तपश्चर्या असते. एका चुकीच्या व्यवस्थेचा फटका फक्त गुणपत्रिकेला बसत नाही, तर अनेक घरांच्या आनंदालाच ग्रहण लागते.
यशसारख्या आणखी विद्यार्थ्यांनी अशा असह्य तणावामुळे आयुष्य संपवण्याचा विचारही करू नये, एवढी तरी संवेदनशील आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था देशाला उभी करता आली, तरच 'जस्टिस फॉर यश' या चार शब्दांना खरा अर्थ प्राप्त होईल. यश परत येणार नाही, पण त्याच्या जाण्याने व्यवस्था जागी झाली, तर कदाचित आणखी एखादे स्वप्न वाचेल. हीच यशला खरी आदरंजली ठरेल.