

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
गत वर्षभरात मुुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्टमधून 1530.70 लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, रसायने, लोखंड, कोळसा, सुतीकापड आदींची निर्यात, तर वाहनांचे सुटे भाग औद्योगिक वस्तूंची आयात करण्यात आली. भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट म्हणून जवाहरला नेहरू पोर्ट (जेएनपीटी) उदयास आले आहे.
मुंबइपासून 45 किलोमीटरवर असलेल्या रायगड, उरण, न्हावा शेवा या भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर 26 मे 1989 रोजी जवाहरलाल नेहरू पोर्टची उभारणी करण्यात आली. मुंबई पोर्टवरील ताण कमी करून आधुनिक आणि जलद मालवाहतूक सेवा देणे हे या पोर्टचे उद्दिष्ट आहे. येथून कंटेनर, बल्क कार्गो (धान्य, कोळसा, खनिजे), लिक्विड कार्गो (तेल, रसायने) आदींची वाहतूक करण्यात येते. भारतातील एकूण समुद्री कंटेनर वाहतुकीत जेएनपीटी पोर्टची 40 टक्क्यांहून अधिकची भागीदारी आहे. जेएनपीटीतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालाची निर्यात व आयात होते. पोर्टवरून वाहन, औद्योगिक साहित्य, औषधे, स्टील, कृषी उत्पादने आणि कंटेनर यांचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतो. पोर्टने अलीकडच्या वर्षांत डिजिटल आणि लॉजिस्टिक सुधारणा केल्यामुळे वाहतूक क्षमता वाढली आहे. पोर्टतर्फे लॉजिस्टिक पार्क आणि गोदाम सुविधा पुरविण्यात येते. जेएनपीटी पोर्ट रेल्वे व रोडने देशाच्या प्रमुख शहरांशी थेट जोडण्यात आले आहे. जेनपीटी पोर्ट चालविताना सौरऊजेचा वापर करण्यात आला असून, पोर्टवर इलेक्ट्रिक वाहनांद्वारे वाहतूक करण्यात येते. हरितपोर्ट जलशुद्धीकरण प्रकल्प आदी उपक्रम पोर्टतर्फे राबविण्यात येतात.
मुंबई पोर्टची स्थापना ब्रिटिश सरकारच्या काळात 1873 मध्ये करण्यात आली. सुरुवातीस यास बॉम्बे पोर्ट असे नाव होते. कालांतराने त्यास मुंबई पोर्ट हे नाव देण्यात आले. मुंबई पोर्ट हे भारतातील एक जुने, ऐतिहासिक व महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई शहराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आणि अरब समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असे बंदर आहे. मुंबईतील माजगाव, प्रिंसेस डॉक, इंदिरा डॉक, बल्लार्ड इस्टेट आदी भागांत पोर्टची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट हा नैसर्गिक खोल समुद्र बंदराचा प्रकार आहे.
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर म्हणून मुंबई पोर्टची ओळख आहे. हे मुंबई पोर्ट अॅथाॅरिटीकडून चालविण्यात येते. पोर्टचा उपयोग मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, तेल व रासायनकि उत्पादने, कोळसा, कंटेनर आदींच्या वाहतुकीसाठी करण्यात येतो. सुमारे 4 हजार एकरांवर पोर्टचे कामकाज चालते. मुख्यत: पोर्टचे काम इंदिरा डॉक, प्रिंसेस डॉक आणि व्हिक्टोरिया डॉकवर चालते. बंदराजवळील रेल्वे आणि महामार्ग जाळे अत्यंत विस्तृत आहे. मुंबई पोर्ट हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते.
मुंबई पोर्टमधून वर्षभरात 490.26 लाख मेट्रिक टन मालाची आयात, तर 177.57 लाख मेट्रिक टन मालाची निर्यात करण्यात आली. जेएनपीटी पोर्टमधून वर्षभरात 508.71 लाख मेट्रिक टन मालाची आयात, तर 349.46 लाख मेट्रिक टन मालाची निर्यात करण्यात आली.