

रायगड : एक लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देणार्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र विकासाला गती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे स्थापत्य विभागीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. दिघी बंदर आणि दिधी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी या विभागीय कार्यालयातून कामकाज चालणार आहे.
पालघरमधील वाढवण बंदरापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर विकासाला चालना देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी नव्याने स्थापत्य विभागाचे कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार माणगाव येथे विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत दिघी बंदराला लागून असलेल्या परिसरात औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे.
प्रकल्पाबाबत माहिती देताना एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी भानुदास यादव यांनी सांगितले, की माणगाव आणि रोहा, मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि म्हसळा तालुक्यात पसरलेल्या या क्षेत्रासाठी दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरियाच्या (डीपीआयए) माध्यमातून एकूण 6 हजार 56 एकर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. यासाठी केंद्राने 5 हजार 469 कोटी रुपये उपलब्ध केले असून, प्रकल्पाची गुंतवणूक क्षमता तब्बल 38 हजार कोटीची आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून एकूण एक लाख 14 हजार 183 जणाना रोजगार मिळणार असल्याने स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. दक्षिण रायगडच्या विकासात हे औद्योगिक क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास परिसरातील नेतेमंडळीना आहे.
एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती दिघी बंदरातील औद्योगिक क्षेत्रासाठी 38 हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित असून, एक लाख 14 हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये अभियात्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योग तसेच रासायनिक उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्याचा समावेश असेल. याशिवाय सात एमएमटीच्या एकूण क्षमतेसह स्टोरेज यार्ड, अतिरिक्त साठवण क्षेत्राचा विकास, कोळसा, बॉक्साइट, स्टील कॉइल साठवण्याची व्यवस्था, 45 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले बंदिस्त गोदाम, 365 दिवस चालू राहणारे बंदर अशा सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
प्रकल्पासाठी जलमार्गही सुलभ असून, विविध बंदरे जवळ आहेत. जेएनपीए बंदर 104 किलोमीटर, मुंबई पोर्ट 153 किलोमीटर आणि दिघी पोर्ट 55 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास बंदरांशी संलग्न औद्योगिकीकरण असल्याने कंपन्यांना नक्कीच फायदा होणार आहे. माणगाव-पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गापासून जवळ असल्याने वाहतुकीसाठीही सुलभ होणार आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत औद्योगिक क्षेत्र विकसित होणार असले तरी यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा आणि माणगावमधील जवळपास नऊ गावांचा समावेश आहे. या नऊ गावांचा विकास एनआयसीडीसी करणार असून, 13 गावांचा विकास एमआयडीसी करणार आहे. संपादित झालेल्या क्षेत्रात 61.17 हेक्टरवर पादत्राणे आणि चर्मोद्योग क्लस्टर प्रकल्पाची तर एक हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्कची उभारणी होणार आहे. उर्वरित दोन हजार 460 हेक्टरवर केंद्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे.