

नाशिक : इगतपूरी तालुक्यातील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत दोन वर्षात दुसऱ्यांदा भीषण आगीची घटना समोर आल्याने, कंपनी व्यवस्थापनासह शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे बाेलले जात असले तरी आगीमागील नेमके कारण काय? याचा शोध घेण्यासाठी सोमवारपासून (दि.२६) जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीतील लागलेल्या आग प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
१ जानेवारी २०२३ रोजी जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीच्या आगीची घटना स्मरणात असतानाच गेल्या बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास जिंदालमध्ये पुन्हा अग्नितांडव बघावयास मिळाले. आग इतकी भीषण होती की, तब्बल ५६ तासांनंतर ती आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले असून, सुमारे ९० टक्के उत्पादन भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या भयंकर घटनेत दिलासा देणारी बाब म्हणजे आगीपासून ३० ते ६० मीटरवर ठेवण्यात आलेल्या अतिज्वलनशील प्रोपेन गॅस टाकीपर्यंत आगीची धग जाऊ न देण्यास यंत्रणेला आलेले यश होय. जर या टाकीचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण प्रकल्प खाक झाला असताच, शिवाय १५ किलोमीटरपर्यंत स्फोटाचा दूरगामी परिणाम भोगावा लागला असता. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत आता चर्चा रंगत आहे. काहींच्या मते, शॉर्टसर्कीटमुळे आग लागली, तर काहींच्या मते आग अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आली.
दरम्यान, आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी शासनाकडून सोमवारपासून चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी समिती नेमली जाणार असून, त्यात औद्योगिक सुरक्षा विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. समितीच्या माध्यमातून कंपनीच्या फायर ऑडीट अहवालासह औद्योगिक सुरक्षा विभागाकडून केल्या गेलेल्या नियमित तपासणी अहवालाची तपासणी केली जाणार आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून अत्याधुनिक आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या की नाहीत? याची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालक अंजली आडे यांनी दिली आहे.
फायर ऑडिट रिपोर्टसह औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नियमित तपासणी करून दिलेल्या अहवालाची देखील चौकशी केेली जाणार आहे. कंपनीत त्रोटक अग्निप्रतिबंधक उपाययोजना असतानाही अहवालात त्रुटी का दर्शविल्या गेल्या नाहीत?, शासकीय यंत्रणांकडून दिलेल्या अहवालाला कंपनी व्यवस्थापनाने गांभीर्याने का घेतले नाही? याबाबतचा सखोल तपास केला जाणार आहे.