

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती. जवळपास २० अग्निशमन दलाचे २० बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र कंपनीच्या आगीला ४० तास उलटून देखील आग नियंत्रणात आलेली नाही. कंपनीतील मेटालायझर युनिट 1, 2, 3 आणि पोलिस्टर लाईन A B C D पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिल्म्स आणि पीव्हीसी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढतच जात असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या ४० तासांपासून नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातून अग्नीशमन दलाच्या २० गाड्या तसेच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून फोम आणि पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून आगीची तीव्रता वाढतच आहे.
जिंदाल पॉलीफिल्म कंपनीच्या लागलेल्या आगीला ४० तास उलटून गेले तरी आग आटोक्यात आलेली नाही. आता प्रशासनाने तीन किलोमीटर परिसरातील गावांना आणि वस्त्यांना सतर्कतेचा इशारा म्हणून गाव खाली करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीचा तीन किलोमीटर परिसरातील गाव निर्मनुष्य करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
कंपनीच्या आतमध्ये असलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित होण्याची शक्यता आहे. परिसरातील गावे, कंपन्या, शाळा आणि परिसर निर्मनुष्य करण्याच्या प्रशासनाने सूचना देण्यात आल्या आहेत. अजूनही ही आग दोन ते तीन दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.