

इगतपुरी (नाशिक): मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भडकलेली आग अखेर ५६ तासांनंतर नियंत्रणात आली. तीन दिवसांपासून जवळपास २५ अग्निशमन दलाचे १०० हून अधिक बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. त्यांना यश आल्याचे वार्ता पसरताच कंपनी परिघातून सुरक्षितस्थळी रवाना झालेले ग्रामस्थ माघारी आले. गुरुवारी (दि. २२) जिल्हा प्रशासनाने मुंढेगाव, शेणवड खुर्द, बळवंतनगर, मुकणे, पाडळी आदी गावांतील नागरिकांना गाव रिकामे करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि. २३) शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिंदाल कंपनीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
कंपनीतील मेटालायझर युनिट 1, 2, 3 आणि पोलिस्टर लाइन ए, बी, सी, डी पूर्णपणे जळून खाक झाले असून, कोट्यवधींची वित्तहानी झाली आहे. कंपनी आवारातील प्रोफेन गॅस टाकी आगीपासून सुरक्षित ठेवण्यात यंत्रणांना यश आले. अन्यथा दुर्घटनेचे चित्र भीषण झाले असते. बॉयलर आणि प्रोफाइल टँकवर पहिल्या दिवसापासून कूलिंग प्रक्रिया सुरू केली होती. १२ डंपर आणि ४ जेसीबीच्या माध्यमातून कच्चा माल हलविण्यात आला. टेक्निकल पथकाने पडताळणी केली आहे. रात्रीच आग आटोक्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आली, तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार पवार यांनी केले आहे.
भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील अग्निशमन दलांची मदत घेतली गेली. रिलायन्ससह खासगी कंपन्यांनीही मदतीचा हात दिला. आग नियंत्रणात आणण्याचे आव्हान होते. सुरुवातीला धूर होता, पण संधी मिळताच आतमध्ये जाऊन शिटवर पाणी मारले जात होते. अशा कंपन्यांनी फायर ऑडिट केले पाहिजे, त्यांनी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी यांच्याकडून इंडस्ट्रियल सेफ्टी ऑडिट केले असेल. पण फायरसह इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटदेखील करायला हवे, अशी माहिती महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे सहायक संचालक किरण हत्याल यांनी दिली. आग आटोक्यात आली असली, तरी दोन ते तीन दिवस धूर निघत राहील, असेही ते म्हणाले.
तीन दिवसांनी आग आटोक्यात आली असली, तरी ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे दोन दिवस धूर बघायला मिळेल. दोन वर्षांपूर्वी लागलेली आग आणि आताच्या घटनेमागील नक्की कारण काय? याचा तपास केला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खबरदारी घेण्यात आली होती का? आग कशामुळे लागली? याचा शोध घेऊन तज्ज्ञ अहवाल देतील, दोषींवर कायद्याच्या चौकटीत कारवाई होईल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कंपनीने टेक्निकल ऑडिट केले असल्याचे सांगितले आहे. मात्र चौकशीमध्ये सर्व माहिती समोर येईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. तीन दिवसांपासून धूर बाहेर पडतोय, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याचेदेखील सर्वेक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्रालय नोडल अधिकारी, रिलायन्स आणि इतर अनेक विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.