

ओझरखेड (नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे समोर येत आहे. ओझरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओझरखेड, कोशिंमपाडा, भुतारशेत, थोरातपाडा या गावांमध्ये केवळ एक फूट खोल जलवाहिन्या टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, पहिल्याच पावसात या जलवाहिन्या उघड्या पडल्याने योजनेवरील सरकारी खर्च वाया गेला आहे.
ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच आणि ठेकेदार यांच्यावर, संगनमताने ही निकृष्ट कामे केल्याचा आरोप केला आहे. योजने अंतर्गत जलवाहिनी कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असले, तरी ग्रामसभेत त्याचे वाचन न करता काम सुरू करण्यात आले, अशीही तक्रार आहे. पाइपलाइन खोल न टाकल्यामुळे पहिल्याच पावसात ती उघडी पडली असून, या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ओझरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओझरखेड, कोशिंमपाडा, भुतारशेत, कडेगहाण, थोरातपाडा आणि तुंगारपाडा या गावांचा विकास अद्यापही खुंटला आहे. गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे नादुरुस्त आहेत. स्मशानभूमीला शेड नाही, सभामंडप उभारले गेलेले नाहीत. प्राथमिक शाळांना संरक्षक भिंती नाहीत. गावांतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दुरवस्था असून, दलदलीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे थंडी, ताप, मलेरिया, अतिसार यांसारखे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या कामाची पाहणी केली असता, संबंधित काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाइपलाइन पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. वरिष्ठांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
जयराम भुसारे, तालुकाध्यक्ष, भाजप