

Half of the 733 schemes of Jaljeevan Mission are incomplete
जालना, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतील अनागोंदी कारभारामुळे जालना जिल्ह्यातील ७३३ योजनांपैकी अद्यापही निम्म्याहून अधिक ठिकाणचे कामे अपूर्ण आहेत. दरम्यान, या योजनेतील कामांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्हयात ५४ तक्रारी करण्यात आलेल्या असूनही या तक्रारीवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यातील २० तक्रारींचा चौकशी अहवालच अद्याप सादर करण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे.
जालना जिल्हयात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून तब्बल ५०७ कोटींच्या निधीतून ७३३ योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणेतील अभियंत्यांच्या बेजाबदार कारभारामुळे जिल्ह्यातील ५० टक्केपेक्षा अधिक कामे अपूर्ण आहेत. यातील बहुतांश कामांची मुदत संपलेली असून यानंतर त्या कामांना मुदतवाढ देण्यात आलेली होती.
अनेक कामांची मुदतवाढ देखील संपुष्टात आलेली आहे. मात्र तरीही कामे अपूर्ण राहिलेली आहे. दुसरीकडे जलजीवन मिशनच्या पोर्टलवर मात्र कामे पूर्ण दाखवण्यात आलेली आहे. एकूणच या योजनेतील अनागोंदी कारभारामुळे अनेक गावांतील योजनांची कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. जिल्हयात ५४ तक्रारी करण्यात आल्या आहेत.
यात बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची दोन तालुक्यातील कामांच्या चौकशीबाबत आहे. विशेष म्हणजे आ. कुचे यांच्या तक्रारीनंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समीतीने अद्यापही चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केलेला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
जलजीवन मिशन योजनेतील ज्या योजना १ कोटीपर्यन्त किंवा अधिक निधीच्या आहेत, प्रामुख्याने तीच कामे अपूर्ण आहेत. एकूणच योजनेतील अनागोंदी कारभार, अनियमितता आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे केन्द्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना जालना जिल्ह्यात मात्र अपूर्ण आहे.
जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. दरम्यान, येथील कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यामुळे येथे प्रभारी अधिकारी म्हणून सर्जेराव शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे मला जास्त काही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.