

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. ज्यांना निवेदन द्यायचे त्यांनी द्यावे. पण, पत्ते उधळणे योग्य नाही, पत्ते खेळणे हा प्रकार काय तटकरे यांनी केला नव्हता, असे म्हणत मंत्री भुजबळ यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
नाशिक येथे सोमवारी (दि.21) मंत्री भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता मंत्री भुजबळ म्हणाले की, मला त्याची माहिती नाही, अजित दादांनी काय आदेश दिले मला माहिती नाही. तसेच तटकरे यांचा यात काय दोष, तटकरे काय पत्ते खेळत नव्हते, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले. मंत्री कोकाटेच्या राजीनाम्याबाबत विचारणार केली असता, मंत्री भुजबळ यांनी याबाबत मला त्याची माहिती नाही, असे सांगत त्यावर अधिक बोलणे टाळले. मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी मंत्री भुजबळ म्हणाले की, 18 वर्षे झाले असतील तर हा प्रश्न असू शकतो. कदाचित त्यांची शिक्षा संपली असेल. सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, मला त्याची पूर्ण माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
हनी ट्रॅपप्रकरणी विचारले असता मंत्री भुजबळ यांनी ते मला माहित नाही, त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहे. त्यात आम्ही बोलणे बरोबर नाही, आम्ही त्यावर काही कॉमेंट करणे बरोबर नाही. पोलीस विभाग त्यांचे काम करेल, असे त्यांनी सांगितले.