

नाशिक : फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी जगभरात १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. नाइटिंगेल यांनी परिचर्या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ हा दिन संपूर्ण विश्वभर साजरा केला जातो. रुग्णसेवेत वैद्य–डॉक्टरांइतकेच महत्त्वपूर्ण योगदान परिचारिका व परिचारक देत आले आहेत. परिचारिका दिनानिमित्त फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या मानवतेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश!
१८व्या शतकात १२ मे रोजी महान परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला. त्या अग्रगण्य परिचारिका, व्यवस्थापक, संशोधक, सुधारक आणि लेखिका असे त्यांचे बहुआयामी नेतृत्व होते. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापासूनच गणितात रुची व गती होती. याच गुणांमुळे संख्याशास्त्रातील त्यांचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. स्वतः काम करत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यांची मृत्युसंख्या व त्याची कारणे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी आकृतिबंधाचा अत्यंत चांगला वापर केला. त्यावेळी नुसत्या आकडेवारीमध्ये लक्ष घालण्याइतपत वेळ किंवा आत्मीयता अधिकाऱ्यांमध्ये नव्हती. त्यामुळे आकडेवारीतून मांडलेले अहवाल दुर्लक्षित राहत असत. परंतु नाइटिंगेल यांनी प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठी वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत, याची जाणीव करून दिली.
युद्धभूमीवरील जखमी सैनिकांची रात्रीच्या अंधारात हातात दिवा घेऊन शुश्रूषा केल्यामुळे त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' असे म्हटले गेले. ३८ स्वयंसेवी परिचारिकांसह स्कुटारी येथील रुग्णालयाची साफसफाई आणि नूतनीकरणही त्यांनी केले. त्यामुळे जखमी सैनिकांचा मृत्यूदर ४० टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश मिळाले.
लष्करी रुग्णालयात अस्वच्छ परिस्थितीत जखमी सैनिक मरताना आढळत. तसेच टायफस, टायफॉइड, कॉलरा, डायरिया यांसारख्या आजारांमुळे लढाईत झालेल्या जखमांपेक्षा दहापट अधिक सैनिक मृत्युमुखी पडत होते. नाइटिंगेल यांचा विश्वास होता की, मुख्य समस्या आहार आणि अस्वच्छता या आहेत. त्यामुळे त्यांनी इंग्लंडहून अन्नसामग्री मागवली. तसेच त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारांमुळे ब्रिटिश सरकारकडून कक्षांची स्वच्छता, गटारे, नाल्यांची स्वच्छता आणि वायुवीजन सुधारण्यासाठी स्वच्छता आयोग पाठविण्यात आला. लंडन टाइम्सने त्यांना 'सेवक देवदूत' अशा सार्थ उपाधीने संबोधले होते.
नाइटिंगेल यांना त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल 'रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी'च्या पहिल्या महिला सभासद होण्याचा मान मिळाला. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशननेदेखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले होते. त्यानंतरच्या काळात विज्ञान, कला, युद्ध किंवा व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना बहाल करण्यात येणारा 'ऑर्डर ऑफ मेरिट' या पुरस्काराने त्यांना किंग एडवर्ड यांनी सन्मानित केले.