

नाशिक : नील कुलकर्णी
उत्तम करियर, पटकण अर्थाजन आणि रुग्णसेवेचे समाधान यामुळे नर्सिंग क्षेत्रात करियर करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 'जीएनएम', 'एएनएम' हा नर्सिंगचा शिक्षणक्रम पूर्ण करुन विशितच रुग्णसेवेला प्रारंभ करणाऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदूरबार धुळे या आदिवासी क्षेत्रातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी परिचर्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचा जन्मदिन १२ मे हा जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. रोग्य वैद्यकीय सेवा जीवनावश्यक असून आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक विज्ञानात होणारे शोध यामुळे हे सेवा क्षेत्र अत्यंत झपाट्याने विकसित झाले आहे. डॉक्टरी उपचार सेवेला प्रशिक्षित नर्सिंग आवश्यकच असल्याने नर्सिंग शिक्षणक्रम शिकवणाऱ्या संस्थातही गेल्या दशकात मोठी वाढ झाली. शिक्षणानंतर तत्काळ नोकरी अन् अर्थाजनामुळे या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.
विशेष म्हणजे नंदूरबार, धुळे, सुरगणा, पेठ या आदिवासी बहुल भागातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. नर्सिंग शिक्षणक्रम पूर्ण करुन काही महिने मोफत सेवा देणाऱ्या 'फ्रेशर्स' नर्सिंग कौशल्य अवगत करुन स्वत:च्या पायावर उभ्या हाेतात. अनेक हॉस्पिटल्स प्रशिक्षणा दरम्यान अशा विद्यार्थ्यांची निवास आणि जेवण व्यवस्था करतात. सेवा आणि निवास यामुळे नवीन नर्स लगेच सेवेसाठी सज्ज होत कौशल्य प्राप्त करतात. विशेष म्हणजे आदिवासी भागातील मेल नर्सचेही प्रमाणही वाढल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
नर्सिंक शिक्षण पूर्ण होताच नोकरी लागली. अपघातात जखमी, ट्रॉमा झालेले रुग्ण यांना सेवा देता येती याचे समाधान आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासह स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी हे क्षेत्र निवडले. यात अनुभव घेऊन पुढे सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न आहे.
आलिशिबा कोकणी, नर्स, नाशिक.
नर्सिंग मानवतेचे काम आहे.. रुग्णांच्या वेदना, दु:ख कमी करण्यासाठी आपल्याला योगदान देता येते याचा अभिमान वाटतो. रुग्ण बरा होताना पाहण अत्यंत आनंददायी असते. अनेक वयोवृद्ध तसेच बालकांशी नवे जिवाभावाचे, जिव्हाळ्याचे नवे नातेही तयार होते.
जयश्री गावित नर्स. नाशिक.
वैदयकीय क्षेत्र विस्तारल्याने नर्सिंग क्षेत्रात विपूल संधी आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहता येते. सरकारी शिष्यवृत्ती अन् सेवेच्या संधी यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यींचे प्रमाण लक्षणिय वाढत आहे.
डॉ. पुर्णिमा नाईक, प्राचार्य, मविप्र परिचारक महाविद्यालय, नाशिक.