

नाशिक : निल कुलकर्णी
जिल्ह्यातील कोठुळे गावात उगम पावलेला मलखांब क्रीडा प्रकाराचा प्रसार राष्ट्रीय खेळ म्हणून सर्वत्र होत आहे. मलखांबचे सर्वाधिक व्यायामशाळा, सर्वाधिक प्रशिक्षक आणि दिवसेंदिवस वाढणारे मलखांबपटू यामुळे नाशिक हे राज्यात मलखांबची नगरी म्हणून नवीन ओळख धारण करत आहे.
येथील मातीतून जन्मलेला मलखांब हा सर्वांग क्रीडा प्रकार! या खेळाने चपळ, पिळदार, लवचीक शरीर, निरोगी आरोग्य अन् मनाची एकाग्रता वाढते. कुस्तीसह अन्य खेळांसाठी हा पूरक प्रकार म्हणूनही याची उपयुक्तता आहेच. काही वर्षांपूर्वी जे मलखांबपटू येथून निपुण झाले, ते आज जिल्ह्यात मलखांबचे प्रशिक्षक म्हणून उत्तम खेळाडू घडवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक प्रशिक्षक तसेच मलखांबपटूंची संख्याही लक्षणीय वाढली आहे. मलखांबचा प्रसार आणि प्रचारासाठी येथील शतकोत्तर वाटचाल करणारी यशवंत व्यायामशाळा ही या क्रीडाप्रकारासाठी मोठे योगदान देत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी किमान एक ते दोन वर्ष मोफत मलखांब प्रशिक्षण वर्ग दिले जाणार आहे. शहरातील अनेक इंग्रजी शाळांमध्येही तरुण मलखांबपटू प्रशिक्षक म्हणून खेळाडू घडवत आहेत. क्रीडा कोट्यातून येथील चंचल माळी, उत्तरा भावसार या दोन्ही मलखांबपटू क्रीडा अधिकारी पदावर यशस्वी कार्य करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथेही मलखांब खेळाचा प्रसार प्रचार होत असून, जिल्ह्यात या खेळात मुलींची संख्या लक्षणीय वाढत आहे. शहरातून कृष्णा आंबेकरसारखे राष्ट्रीय खेळाडू नाशिकचे नाव देशभर उज्ज्वल करत आहेत. एकूणच शहर हे मलखांबनगरी म्हणून नवीन ओळख धारण करत आहे.
दोरीवरचा मलखांब
पुरलेला मलखांब
टांगता मलखांब
जिल्ह्यात २०० हून अधिक मलखांबपटू असून, सर्वाधिक प्रशिक्षकही येथेच आहेत. शासनाचे देशी खेळांसाठी उत्तम धोरण व मोठे प्रोत्साहन आहे. या खेळासाठी खर्च अतिशय कमी आहे. यशवंत व्यायामशाळेत १०० हून अधिक खेळाडू असून, १२ मलखांब आहेत. ५ कोच असून, यंदापासून शाळांशी संपर्क साधून या खेळाबाबत रस वाढावा म्हणून विद्यार्थ्यांना १ ते २ वर्ष मोफत प्रशिक्षण देणार आहोत.
दीपक पाटील, अध्यक्ष, यशवंत व्यायामशाळा, नाशिक.
नाशिकमध्ये मागील दशकात उत्तम मलखांबपटू असलेले अनेक युवा आज प्रशिक्षक झाले आहेत. लहान मुलांमध्ये या खेळाची आवड निर्माण केल्यास त्यांच्यात लवचीकता, चपळता आणि एकाग्रता निर्माण होऊन, त्यांना निरोगी आरोग्य लाभेल आणि नंतर ते उत्तम कोच होतात. मलखांबपटूंना खेळात अन् सरकारी अधिकारी होण्यासाठी सेवा परीक्षा देऊन कोट्यातून उत्तम करिअरची संधी उपलब्ध हाेते.
अक्षय भावसार, मलखांब प्रशिक्षक, नाशिक.
मलखांब सर्वांगाला लवचीकता देणारा, चपळता वाढवणारा आणि एकाग्रता वृद्धिंगत करणारा क्रीडाप्रकार आहे. नाशिकच्या मातीत जन्मलेला हा रांगडा खेळ अन्य खेळांसाठीही हा पूरक क्रीडाप्रकार आहे. येथील मलखांबपटू, प्रशिक्षक यामुळे शहराला मलखांबनगरी म्हणून ओळख मिळत आहे.
अमर पाटील, मलखांब प्रशिक्षक, नाशिक.