

नाशिक : जगात आईचे वात्सल्य, त्याग अन् कष्टाची मोठी महती गायली जाते परंतु अनेक वेळा बापाचे काम समोर येत नाही. अनेकांच्या जीवनात वडिलांचे स्थान, त्याग, प्रेमभावना शब्दातीत असते. मुलांना मोठे करण्यासाठी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन नोकरी, व्यवसायात अनेक वेळा खस्ता खाऊन त्यासाठी आकाशाएवढे सुख, यश मिळवून देणारे वडील त्यामुळेच ‘बाप’माणूस ठरतो. मुलांच्या यशासाठी सर्वस्व पणाला लावणार्या अशाच वडिलांची कहाणी, प्रेम आणि महती ‘फादर्स डे’निमित्त दै. ‘पुढारी’ने अधोरेखित केली.
बागलाण तालुक्यातील अंतापूर- ताहाराबाद येथील योगेश सोनवणे या सायकलपटूने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. झोपडीत राहात असलेले आणि शेतमजूर असणारे त्याचे वडील नामदेव सोनवणे यांचे या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी कर्ज काढून मुलाला सायकल विकत घेऊन दिली. त्यावर योगेशने सराव सुरू ठेवला. चीन येथील स्पर्धेत योगेशची सायकल 8 फूट उंच उडी घेताना तुटली, तरीही त्याने जिद्द न सोडता हातात सायकल घेऊन 2 किमी अंतर धावून पूर्ण केले. स्पर्धेत त्याचे स्वप्न भंगले, तरीही टॉप 10 खेळाडूंमध्ये त्याची नोंद झाली. त्याच्या मनात जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन पेरण्यात नामदेव यांचे मोठे योगदान आहे.
सिन्नर तालुक्यातील पास्ते या गावात पानटपरीचा व्यवसाय करून गणेश आव्हाड यांनी मुलगा प्रसाद याच्यातील मूर्ती, चित्रकलेला खतपाणी घातले. प्रतिकूल परिस्थितीत चार मुलांचा सांभाळ करत त्यांनी कलेसाठी मुलाला हवी ती सामग्री उपलब्ध करून दिली. ‘तू फक्त कलेवर लक्ष केंद्रित कर. आम्ही तुला हवे ते पुरवू’ असे ते सांगत. कोविड काळात टपरी बंद झाल्यानंतर दूध व्यवसाय करून त्यांनी मुलांच्या बोटात अन् मनात रंग भरले. वडिलांच्या त्याग, कष्टांची जाणीव ठेवत प्रसादने चित्र विदेशात विकून गोठ्यात स्टुडिओ उभारला. वडिलांचे कोविड काळातील कर्ज फेडले. तो उत्तम चित्रकार म्हणून ओळखला जातो. ‘प्रसादला मला आंतरराष्ट्रीय चित्रकार झालेला पाहायचे आहे. तेव्हा अनिमिषपणे ते यश मी डोळ्यात साठवून ठेवेन’, असे हळवे उद्गार गणेश आव्हाड काढतात.
लालसगाव येथील टोपल्या- केरसुणीचा व्यवसाय करणार्या गोकुळ मोरे यांनी मुलामधील चित्रकलेचा गुण ओळखत मुलगा दर्शन मोरेच्या हातात कुंचला दिला. चित्रकला शिक्षण महागडे समजले जाते कारण रंग, कॅनव्हास, फीस आदी खर्च मोठा असतो. वडिलांनी केरसुण्या विकून दिव्यांग मुलगी आणि दर्शनला शिक्षण दिले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत दर्शनने बीएफएला प्रवेश घेतला आणि वेगळ्या शैलीने अनेक बक्षिसांवर नाव कोरले. गोकुळ आजही त्याच व्यवसायात असून, दर्शन आपली चित्रे विकून शिक्षणाचा खर्च भागवत असतो. ‘मुलगा जागतिक कीर्तीचा कलावंत होईल अन् मी त्याच्याकडे डोळे भरून पाहात राहीन.’ असे मोरे सांगतात.