

Railways: Action taken against 73,000 passengers who did not purchase tickets in Nanded division
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेने अनेक प्रवासी सर्रासपणे विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी नुकताच कारवाईचा बडगा उगारला होता. तिकीट तपासणी एप्रिल ते जूनदरम्यान करण्यात आली. यात विनातिकीट प्रवास, अनियमित तिकिटावर प्रवास, सामान बुक न करणे, अशा सुमारे ७३ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ११ लाख रुपये वसूल केले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात येणाऱ्या अनेक मोठ्या स्टेशनवर पहाटे पाच ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्णा आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एन. एस. राव यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात तपासणी पथकाने विनातिकीट, आरक्षित डब्यांत घुसखोरी, सीझन तिकीट धारक, अनधिकृत फेरीवाले, यांच्यासह इतरांवरही कारवाई केली.
एप्रिल ते जूनपर्यंत, नांदेड विभागाने ७३ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करत ४ कोटी ११ लाख रुपये वसूल केले. २० जुलैपर्यंत तिकीट न भरणे आणि इतर अनियमिततेच्या १२ हजार ८०३ प्रकरणांमध्ये ६२ लाख ८५ हजार रुपये वसूल केले. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले आणि अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. के. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा नियमितपणे राबविल्या जात आहेत.