

Eknath Shinde should be re-appointed as Chief Minister.
नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, ही कार्यकर्त्यांची भावना असेल, तर त्यात गैर काय, असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचा दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर दादा भुसे यांना संधी द्यावी अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमधील पाथर्डी परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. मंत्री सामंत यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी यांच्यासह उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, संपर्कप्रमुख विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये प्राथमिक सभासद नोंदणी निवडणूक कार्यक्रमावर चर्चा झाली. यावेळी स्थानिक पातळीवरील अनेक विषय पदाधिकाऱ्यांनी मांडले असून, त्या संदर्भातील अहवाल उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे. बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी विराजमान व्हावे अशी भावना व्यक्त केली, असे नमूद करत शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यात गैर काय, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला. शिंदे यांच्या निर्णयामुळेच महायुतीची राज्यात सत्ता आली, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी भल्याभल्यांचे विसर्जन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उरलेसुरले विसर्जित होतील. नाशिकमध्ये उबाठा व मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलन बैठकीमध्ये झालेल्या वादाचा संदर्भ देत भविष्यात या युतीचे काय होणार, याचे चित्र स्पष्ट झाल्याचे सामंत यांनी सांगितले.
ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेल्यांबद्दल काय बोलणार असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. शिंदे दिल्लीत मोदींच्या खुचीला खुर्ची लावून बसतात. ठाकरे मात्र दिल्लीत जाऊन सहाव्या रांगेत बसतात, त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, अशीही टीका त्यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीने एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे. मात्र वेळ पडल्यास नाशिकसह सर्वच ठिकाणी स्वतंत्रपणे सर्वच जागा लढण्याचीही आमची तयारी असल्याचा दावा उद्योगमंत्री सामंत यांनी केला.