

कोडोली : कोडोली जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देवून बोलते केले. ‘कुणाला मुख्यमंत्री व्हायचंय?’ असा मिश्किल सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. यावेळी उपस्थितांनी त्याला चांगलीच दाद दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागामुळे कोडोली शाळा प्रवेश दिनाला उत्साहाची झालर लाभली.
कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. ‘मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा’ असे आवाहन केले करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे त्यांनी सांगितले.
सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 205-26 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन ना. एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले, शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवत असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन ना. शिंदे यांनी केले. आ.महेश शिंदे म्हणाले नवागतांच्या स्वागतच्या उत्सवातून मुले शाळेत आली पाहिजेत, ती टिकून ठेवण्याचे काम शिक्षकांचे आहे. देशाची आदर्श पीढी घडविताना त्यांच्यावर होणारे चांगले संस्कार महत्वाचे आहेत.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये आनंददायी शिक्षणावर भर देण्यात येत असून त्यासाठी 220 शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबवण्यात येत आसलेल्या विविध योजनांची, उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी सरपंच सौ.स्वाती भोसले, उपसरपंच रेहणा मुलाणी, रामदास साळुंखे, मनोज गायकवाड, संदिप शिंदे, मुख्याध्यापक अनिल जायकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन विठ्ठल माने यांनी केले.