

नाशिक : अंजली राऊत
निसर्गाचा समतोल राखण्यात आणि मानवी अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधमाश्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षी २० मे रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात विविध शासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील पहिले व दोन एकर परिसरात असलेले अॅपी टुरिझम सेंटरबाबत जाणून घेऊ या. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे २०१९ मध्ये बसवंत मधमाशी उद्यानाची स्थापना करण्यात आली. मधमाशी हे केंद्रस्थानी ठेवून देशातील पहिले अॅपी-टुरिझम सेंटर झाले आहे.
ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि. तथा बसवंत गार्डन पर्यटन प्रकल्पाचे कार्यकारी संचालक संजय पवार यांच्या नियोजनातून याची उभारणी झाली. या केंद्रात मधमाशीचे संरक्षण, शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या संवर्धनाचे लाभ, पर्यटनाच्या अनुषंगाने समजावले जातात.
मधमाश्यांनी केलेल्या परागीभवनामुळे कसदार व भरघोस कृषी उत्पादन प्राप्त होते. या बरोबरच आरोग्यदायी मधासह मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, परागकण इत्यादी मौल्यवान पदार्थ मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह युवावर्गाला स्वयंरोजगार प्राप्त होत आहेत.
मनोरंजनातून प्रबोधन आणि लोकशिक्षण साध्य करीत, मधमाशी पर्यटनाच्या माध्यमातून युवा पिढी तसेच शेतकरी बांधवांचे उद्योजकता विकासाशी नाते जोडणाऱ्या या उद्यानाची आता देश विदेशात ख्याती झालेली आहे. त्याचप्रमाणे मधमाशी पालन क्षेत्रातील उद्योजक, शास्त्रज्ञ व विचारवंतांच्या विविध यजमान देशांत आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील अपिमोंडिया परिषद घेतली जाते.
मधमाशी पालकांसाठी दरवर्षी बसवंत हनी बी फेस्टिवल आणि बसवंत मधुक्रांती परिषद भरविण्यात येते. या उपक्रमांमुळे स्वयंरोजगाराला प्राधान्य देऊन मधमाशी पालनाबाबत जनजागृती होत आहे.
मधापासून चॉकलेट्स
अॅपी-टुरिझम सेंटर येथे येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारचा अस्सल मध चाखायला मिळतो. मधापासून तयार केलेली चॉकलेट्स, बालुशाही, हनी आवळा कँडी, हनी लेमन ज्यूस, हनी गुलकंद असे विविध आरोग्यदायी पदार्थदेखील येथील सोव्हिनियर शॉपमध्ये उपलब्ध आहेत.
मधमाश्यांचे गुंजन तुलसीबन व बी-मेडिटेशन सेंटर
येथील तुळशीच्या उद्यानात मधमाश्यांच्या सान्निध्यात राहण्याचा प्रसन्न अनुभव घेता येतो. बी-मेडिटेशनची (मधमाश्यांचे गुंजन ऐकत करावयाचे ध्यान) यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
मधमाशी मानवाला मधासह इतरही आरोग्यदायी पदार्थ देते. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे तिच्या परागीकरणाद्वारे कसदार आणि भरघोस कृषी उत्पादनांची शाश्वती मिळते. सजीवसृष्टीला सर्वतोपरी उपकारक ठरणाऱ्या या छोट्या कीटकाच्या संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व पर्यटनाच्या मनोरंजक माध्यमातून समाजाला कळावे, ही बसवंत मधमाशी उद्यानाच्या उभारणीमागील मूलभूत संकल्पना होती. या प्रयत्नाला यश येत असल्याचे समाधान आहे.
संजय पवार, कार्यकारी संचालक, मधमाशी उद्यान प्रकल्प.