

लासलगाव : राकेश बोरा
भारतीय कृषी व प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी मिळत असून, त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश आहे. 'अपेडा'च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांत भारतातून ३८ हजार ९१६ मेट्रिक टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात झाली असून, त्यातून देशाला तब्बल १,३९१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
भारत हा दूध उत्पादन करणारा प्रमुख देश असून, २०२४-२५ मध्ये देशात २४७.८७ दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. दूध उत्पादनाबरोबरच गाईचे तूप, लोणी, पनीर, दूध व क्रीम, प्रक्रिया केलेले चीज आदी मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळत आहे.
'अपेडा'च्या माहितीनुसार २०२५-२६ मध्ये भारतीय दुग्धजन्य पदार्थांसाठी यूएई आणि सौदी अरेबिया ही प्रमुख बाजारपेठ आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका, भूतान आणि बहरीन यांचा समावेश होतो. विशेषतः भारतीय तुपाला आखाती देशांमध्ये मागणी असून, अमेरिका व ऑस्ट्रेलियासह विविध बाजारपेठांमध्येही भारतीय दुग्धजन्य पदार्थांसाठी संधी वाढत असल्याचे 'अपेडा'च्या बाजार अभ्यासातून दिसते.
फळे, भाज्या आणि अन्य कृषी उत्पादनांप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थांची निर्यात वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांसाठी नव्या बाजारपेठा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्मितीला आणि गुणवत्तापूर्ण निर्यातीला भविष्यात अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे.
दुग्धजन्य पदार्थ निर्यात आकडेवारी
सन २०१७-१८ - १,१९६ कोटी
सन २०१८-१९ - २,४२३ कोटी
सन २०१९-२० - १,३४१ कोटी
सन २०२०-२१ - १,४९१ कोटी
सन २०२२-२३ - २,२६९ कोटी
सन २०२३-२४ - २,२६० कोटी
सन २०२४-२५ - ४,१८२ कोटी
सन २०२५-२६ - ३,५९१ कोटी
दुग्धजन्य पदार्थांची निर्यातवाढीचे फायदे
दुग्धजन्य पदार्थांची निर्यात वाढणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. निर्यातीने देशाला परकीय चलन मिळते व वित्तीय तुट कमी होण्यास हातभार लागतो. याशिवाय देशात दुधाची मागणी वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी चांगला दर मिळतो. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जास्तीत जास्त शेतकरी दुग्धव्यवसायकडे वळतील आणि त्यामुळे एक शाश्वत जोडधंदा उभारीस येईल.