

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या खूप जवळ पोहोचले आहेत. हा करार आधीच्या करारापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भारत दौरेवर असणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही काही आठवड्यांतच हा करार पूर्णत्वास जाईल, असे स्पष्ट केले.
अमेरिकेच्या दोन्ही नेत्यांनी हे संकेत दिल्याने कराराबाबत असणारी संदिग्धता संपुष्टात आली आहे. मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. त्यांची करार करण्याची इच्छा आहे. आम्हीही करार करणार आहोत. अगदी जवळ आलो आहोत.
दरम्यान, जामनगर येथे बोलताना मार्को रुबियो यांनी अमेरिकेची भारताबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एच-१बी व्हिसा धोरणाबाबत अमेरिकेने घेतलेले निर्णय भारताला लक्ष्य करण्यासाठी घेतलेले नाहीत. पाकिस्तानशी असणारे संबंध भारताच्या मैत्रीची किंमत चुकवून प्रस्थापित होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारत-अमेरिका संबंध हे वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा कणा असून बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असून काही आठवड्यांतच त्यावर स्वाक्षरी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावर गेली दीड वर्षे चर्चा सुरू आहे.
या कराराविषयी बोलताना रुबियो म्हणाले, या कराराचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आम्ही महिन्यांच्या नव्हे, तर अवघ्या काही आठवड्यांच्या अंतरावर आहोत. दोन्ही बाजू करारातील तांत्रिक शब्दावली आणि व्याख्यांवर एकमत करत आहेत, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. उर्वरित १ टक्के काम संपवून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल.
अमेरिकेतील एच-१बी व्हिसावरील बंधने आणि स्थलांतर धोरणाबाबत भारतीय समुदायात असलेल्या चिंतांवर रुबियो यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात बेकायदेशीर स्थलांतरामुळे अमेरिकेची यंत्रणा कोलमडली होती. आम्ही केवळ कायदेशीर चौकटीत सुधारणा करत आहोत. हा निर्णय कोणत्याही देशाला किंवा भारताला लक्ष्य करून घेतलेला नाही. कायदेशीर मार्गाने शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांचे अमेरिकेत नेहमीच स्वागत आहे.
पाकिस्तानशी अमेरिकेचे संबंध भारताच्या हिताला बाधा पोहोचवून कधीही प्रस्थापित होणार नाहीत, अशी ग्वाही रुबियो यांनी दिली. चीनबाबत बोलताना त्यांनी जागतिक आर्थिक स्थैर्या राखण्यासाठी समतोल भूमिका आवश्यक असल्याचे सांगितले. रशिया-युक्रेन संघर्षात युद्धबंदीसाठी भारताने मांडलेल्या प्रस्तावाचे त्यांनी कौतुक केले असून, भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचे अमेरिकेने स्वागत केले आहे.
राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदीवर निर्बंधातून दिलेली तात्पुरती सूट ही नवी दिल्लीसाठी मोठा दिलासा ठरला आहे. यावर भाष्य करताना रुबियो यांनी सांगितले की, अमेरिकेच्या आयात शुल्काचा (टॅरिफ) उद्देश भारताला त्रास देणे किंवा शिक्षा करणे हा कधीच नव्हता.
ट्रम्प प्रशासनाला हे ठाऊक आहे की, अशा निर्बंधांचा भारत-अमेरिका संबंधांवर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दबाव निर्माण करतानाच भारतासारख्या महत्त्वाच्या भागीदाराशी संबंध बिघडू नयेत, असा समतोल अमेरिका साधत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.