

लासलगाव : राकेश बोरा
देशात मध उत्पादनामध्ये मोठी क्रांती झाली असून, कोविड संक्रमणानंतर जागतिक पातळीवर मधाची मागणी वाढली आहे. मध आरोग्यदायी असून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशात झालेल्या मधक्रांतीमुळे यंदा ४ महिन्यांमध्ये ४१ हजार ८५३ टन मधाची निर्यात झाली असून, या उत्पादनाच्या निर्यातीतून ६३४ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे.
देशात मध उत्पादन व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मधुमक्षिकापालन व्यवसाय किती पुढे गेला आहे, याची प्रचिती या आकडेवारीवरून दिसत आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. २०२५-२६ या वर्षातील १ लाख १४ हजार ५७० टन नैसर्गिक मध निर्यात होऊन, १,८३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
देशात अजूनही मोठ्या प्रमाणात मध उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने केले जाते. यात अलीकडील काळात बदल होऊन स्थलांतरित स्वरूपाच्या मधमाशीपालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होत असल्यामुळे बाहेरील देशांमधून मागणी वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे कृषिपूरक व्यवसायास रोजगाराची संधी म्हणून पाहिल्यास अर्थकारणाला मोठा वाव आहे.
फुलोऱ्यानुसार दर:
विविध पिके व झाडांपासून संकलित होणाऱ्या मधाचे दर वेगवेगळे असतात. फुलोऱ्यानुसार दर ठरतो. तुळस, सूर्यफूल, ओवा, शिसम, कोथिंबीर, घोडेघास, मोहरी, लिची तसेच नैसर्गिक रानफुलांच्या फुलोऱ्याचा आधार घेत मधमाशांच्या वसाहती तयार करून, मध संकलित करण्यावर अनेक तरुण व्यावसायिक पुढे येत आहेत.
"मधमाशीपालनाला प्रोत्साहन देताना रसायनमुक्त उत्पादन, शास्त्रीय प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषांवर भर दिला पाहिजे. मधमाशांचे संवर्धन झाले, तर मधाचे उत्पादन वाढण्याबरोबरच पिकांच्या परागीभवनातून शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होऊ शकते."
— कृषितज्ज्ञ सचिन आत्माराम होळकर, लासलगाव.