Police Bharti | धावण्याचा वेग मंदावल्याने गुणांवर परिणाम

पोलिस भरती : प्रवर्गनिहाय यादी लवकरच होणार प्रसिद्ध
Police recruitment
Police Bhartifile photo

नाशिक : नाशिक शहर पाेलिस आयुक्तलयातर्फे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत अनेक उमेदवारांनी गोळाफेकीत पैकीच्या पैकी गुण मिळवले. मात्र धावण्यात त्यांचा वेग कमी पडल्याने त्यांच्या एकूण गुणांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना २५ पेक्षाही कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन तृतीयपंथीयांसह अनेक उमेदवारांना २५ पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.

नाशिक शहर आयुक्तालयातील शिपाई पदाच्या ११८ रिक्त जागांसाठी सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत ७ हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केला. त्यापैकी ४ हजार ३७४ उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरीत उमेदवार गैरहजर राहिले किंवा उंची व छाती मोजमापात ते अपात्र ठरले होते. मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांमध्ये दोन तृतीयपंथी उमेदवारांसह अनेक उमेदवारांना ५० पैकी २५ पेक्षा कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण झाले आहेत. तर उर्वरित उमेदवारांची प्रवर्गनिहाय लेखी परीक्षेकरीता निवड यादी आयुक्तालयामार्फत जाहीर होणार आहे. शहरातील हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर १९ ते ३० जून या कालावधीत मैदानी चाचणीत उंची व छातीच्या मोजमापात दोनशेपेक्षा जास्त उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर झालेल्या मैदानी चाचणीत चार हजारांपैकी अनेक उमेदवारांना सोळाशे व आठशे मीटर धावण्याच्या चाचणीत शून्य गुण मिळाले आहेत. मात्र गोळाफेकमध्ये बहुतांश उमेदवारांनी सर्वाधिक गुण मिळवले. मात्र धावण्यात कमी गुण मिळाल्याने ते मैदानी चाचणी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसून आले.

Police recruitment
पोलीस भरती | संधी मिळत नाही तोवर हटणार नाही

पोलिस आयुक्तालयाने ४ हजार ३७४ उमेदवारांची गुणतालिका जारी केली असून त्यानुसार पंचवीसपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांची निकष व प्रवर्गानुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. एका पदाकरीता दहा उमेदवार या समीकरणानुसार पंचवीस पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सुमारे अठराशे उमेदवारांची लेखी परिक्षा होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवून पोलिस दलात सहभागी होण्याची संधी उमेदवारांना आहे. दरम्यान, भरतीसाठी बारावी, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांसह इंजिनीअरिंग, फार्मसी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनीही अर्ज केल्याचे आढळून आले. त्यातील अनेक उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाल्याने लेखी परिक्षेत अभ्यासाच्या जाेरावर त्यांनी चांगले गुण मिळवल्यास लेखी परिक्षेतील गुणांचा आलेख वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

७ जुलैला लेखी परिक्षा

शहर पोलिस दलातर्फे लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लवकरच जाहिर होईल. त्यानुसार येत्या ७ जुलैला लेखी परिक्षा होणार अहे. परिक्षार्थींना शहर पोलिसांतर्फे पॅड, काळा पेन पुरवला जाईल. उमेदवारांना त्यांचे ओळखपत्र, चेस्ट क्रमांक आणणे अनिवार्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news