

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्यावतीने राज्यभरातील डॉक्टरांसाठी 'आयएमए महाराष्ट्र स्पोर्ट्स २०२५' स्पर्धेचे आयोजन केले आहे. आरोग्यासोबत एकतेचा, संघभावनेचा आणि क्रीडा कौशल्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित हा क्रीडा महोत्सवाला शुक्रवारपासून (दि.३१) प्रारंभ होत आहे. २ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा असतील, अशी माहिती आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. निलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेत राज्यभरातील डॉक्टर्स सहभागी होणार असून, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, चेस, अॅथलेटिक्स, फुटबॉल, महिला डॉक्टर्ससाठी बॉक्स क्रिकेट आदी खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेद्वारे डॉक्टरांना केवळ खेळाडूपणाची अनुभूतीच नव्हे तर ताणमुक्ती आणि एकात्मतेचा सुंदर संदेश दिला जाणार आहे. उद्घाटन समारंभास अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे पाचशे डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. मैदानी क्रिकेटसाठी २२ संघांची नोंदणी झाली असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचेही डॉ. निकम यांनी स्पष्ट केले. तर महाराष्ट्र स्पोर्ट्स हा केवळ क्रीडा सोहळा नाही तर आपुलकी, आरोग्य आणि सहकाऱ्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन स्पर्धेचे चेअरमन डॉ. नितीन चिताळकर यांनी केले.
डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली को-चेअरमन कपिल पाळेकर, सचिव सचिन आहेर, खजिनदार सागर दुकळे कामकाज बघत आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून मयुरेश कुलकर्णी, आनंद तांबट, रीना राठी, जयंत रणदिवे, मिलिंद दीक्षित, आनंद सराफ, लखोजी चौधरी, मिलिंद भराडिया, प्रकल्प पाटील, सपना नेरे, संजय पिंचा, विक्रांत वाघ आदी प्रयत्नशिल आहेेत. आयएमए सदस्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आयएमए नाशिकच्या सचिव डॉ. मनीषा जगताप, खजिनदार डॉ. अनिता भामरे यांनी केले आहे.