

नाशिक : आयएमए नाशिक शाखेच्या वतीने राज्यभरातील डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या 'महास्पोर्टस' स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांच्या रविवारी (दि.२) अंतिम लढती रंगणार आहेत. शहरातील तीन मैदानांवर क्रिकेटचे सामने खेळविले गेले असून, अत्यंत रंगतदार अशा लढती बघावयास मिळाल्या. नाशिकच्या दोन संघांसह नांदेड, नागपूर, परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या स्पर्धेचे शुक्रवारी (दि.३१) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी क्रिकेट सामन्यांची चुरस सदस्य डॉक्टरांनी अनुभवली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसाचे सामनेदेखील चुरशीचे झाले. बीवायके मैदानावर आयएमए जळगाव व सीएसएन स्ट्रायकर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर आयएमए ॲव्हेंजर्सविरुद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स परभणी संघाने अवघ्या ३.३ षटकांमध्ये जिंकला. आयएमए नागपूर संघाने आयएमए नांदेड संघाविरुद्धचा सामना २२ धावांनी जिंकला. आयएमए अमरावती टायटन्सविरुद्ध सीएसएन स्पार्टन्स संघाने ३ गडी राखून सामना जिंकला.
अन्य सामन्यात नांदेड संघाने अकोलाविरुद्ध ७ धावांनी सामना जिंकला. नाशिक युनायटेड यंगस्टर्स संघाने चंद्रपूर संघाचा पराभव केला. बुलढाणाविरुद्धच्या सामन्यात भंडारा संघाने ६ गडी राखून सामना जिंकला. परभणीविरुद्ध नांदेड संघाने ३७ धावांनी सामन्यात यश मिळविले. यासह महात्मानगर मैदानावरदेखील काही क्रिकेट सामने खेळविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश निकम, सचिव डॉ. मनिषा जगताप, महास्पोर्टस् स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन चिताळकर, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, सहअध्यक्ष डॉ. कपिल पाळेकर, डॉ. सचिन आहेर, डॉ. सागर दुकळे आदी प्रयत्नशील आहेत.
वैयक्तिक गटातील स्पर्धांना प्रारंभ
आयएमए महास्पोर्टस्अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये क्रिकेटसोबत पोहणे, लॉन टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, मॅरेथॉन, कॅरम, चेस, टेबल टेनिस यासह मैदानी स्पर्धा होत आहेत. शनिवारी या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि.२) होणार आहे.