

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाच्या वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले असून, वाळू माफियांची माफियागिरी जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे एका वाहनाचा परवाना काढून त्याच क्रमांकाच्या दोन ते तीन वाहनांद्वारे अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहे. ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात येत असताना, महसूल प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची टीका होत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक होत असल्यामुळे जेसीबी, डंपर आणि हायवा वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नियमानुसार गौण खनिज वाहतुकीसाठी महसूल विभागाकडून वाहनाचा स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक असतानाही काही माफियांकडून एका वाहनाच्या परवान्यावर इतर वाहनांना त्याच क्रमांकाच्या नंबर प्लेट लावून शासनाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक वाहनांचे क्रमांक मुद्दाम पुसून टाकलेले दिसतात. अशा वाहनांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असतानाही, महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे वाळू माफियांना महसूल विभागातील काही घटकांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्त पथके तयार करून अशा वाहनांची तपासणी करावी, एकाच क्रमांकाच्या वाहनांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
"वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. महसूल प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही. अधिकाऱ्यांनी माफियांना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन व उपोषण करण्यात येईल."
- राजाभाऊ अहिरे, शिवसेना नेते.
"गौण खनिज उत्खनन व वाहतुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. एका वाहनाचा परवाना वापरून त्याच क्रमांकाची इतर वाहने आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल."
- अनिल चव्हाण, तहसीलदार.