

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घराशेजारी संशयास्पदरीत्या थांबलेल्या व्यक्तीला विचारणा केल्याच्या कारणावरून स्थानिक गुंडांनी ३५ वर्षीय दूध व्यावसायिकासह त्याच्या मित्राला डंडुके आणि लाकडी फळीने बेदम मारहाण केल्याची घटना पंचवटीतील नाग चौक, जोशीवाडा परिसरात घडली. यावेळी 'मी या परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुड्डा पाडतो,' अशी धमकी देत संशयितांनी धारदार शस्त्र हवेत फिरवून दहशत माजवली. हल्लेखोरांच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शनिवारी (दि. १७) मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराप्रकरणी मुख्य संशयित किशोर वाकोडे याच्यासह चार जणाविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर अशोक गरद (३५, रा. जोशीवाडा, नाग चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
गरद हे दूध व्यावसायिक असून, मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परतत असताना त्यांच्याजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी संबंधित व्यक्तीला एवढ्या रात्री येथे काय करतो, अशी विचारणा केली असता, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्याच वेळी शेजारच्या बोळीतून आणखी एक संशयित तिथे आला आणि त्याने गरद यांना नाग चौकात नेले.
दरम्यान, गरद यांचा मित्र विकी यशवंत बर्गे हादेखील तिथे आला. वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संशयितांनी आपल्या इतर साथीदारांना दूरध्वनी करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर किशोर वाकोडे याच्यासह चार संशयितांनी सागर गरद आणि विकी बर्गे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि फळीने बेदम मारहाण केली.
एकेकाचा 'मुड्डा' पाडण्याची धमकी
मारहाण सुरू असताना, परिसरातील नागरिक मदतीसाठी पुढे येत असल्याचे पाहून संशयित किशोर वाकोडे याने, 'मला ओळखले नाही का? मी या परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुड्डा पाडतो,' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्याने धारदार शस्त्र काढून ते हवेत फिरवले. नागरिकांवर शस्त्र उगारत त्यांचा पाठलाग केल्याने परिसरात एकच पळापळ झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या घरांचे दरवाजे बंद करून घेतले.