

‘Nashikkars are eager to hear the names of the dignitaries in the Honey (Trap) Enjoy case’
नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या हनी ट्रॅपप्रकरणी दररोज विनाआधार वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत असल्याने, या प्रकरणाची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगत आहे.
सोमवारी (दि. २१) यशवंत व्यायामशाळेजवळ ‘हनी (ट्रॅप) एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांची नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत’ असा आशय असलेला फलक झळकविल्याने चर्चेत भर पडली आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणामुळे पुण्यभूमी नाशिकची बदनामी होत असून, या प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावावा, अशा भावना नाशिककरांनी बोलून दाखविल्या आहेत.
नाशिकच्या एका तारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या कथित हनी ट्रॅपमध्ये प्रशासनातील ७२ वरिष्ठ अधिकारी आणि आजी-माजी मंत्र्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. याप्रकरणाचा विशेष पोलिस पथकाकडून तपास केला जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, स्थानिक पोलिसांकडून याबाबत खंडन केले जात आहे. गेल्या शनिवारी (दि. १९) विशेष पथकाने ज्या तारांकित हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला, त्या हॉटेलमधील खोली सील केल्याची माहिती समोर आली होती.
याशिवाय हॉटेल मालक आणि या प्रकरणातील ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेचा जबाबही पथकाने नोंदविल्याची चर्चा पुढे आली होती. तर आता या पथकाकडून शासकीय अधिकाऱ्यांसह हॉटेल मालकाच्या बँक व्यवहाराची चौकशी केली जात असल्याचे पुढे आले आहे. अर्थात या सर्व तपासास कुठलाही अधिकृत दुजोरा नाही. मात्र, दररोजच्या नवनव्या खुलाशांमुळे त्रस्त झालेल्या काही नाशिककरांनी या प्रकरणातील नावे जाहीर करावीत, अशी मागणी केली आहे. याबाबतचा एक फलक झळकविण्यात आला असून, त्यावर ‘हनी (ट्रॅप) एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत. मनोज, अमित व समस्त नाशिककर.’ असे नमूद आहे.
दरम्यान, पुण्यभूमी नाशिकची या प्रकरणामुळे मोठी बदनामी होत असून, या मान्यवरांची नावे उघड झाल्यास त्यांचा खरा चेहरा समोर येईल. त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरणात तथ्य असेल तर विशेष पथकाने योग्य तपास करून या प्रकरणातील सर्वांची नावे उघड करावेत, अशी मागणीही नाशिककरांनी केली.
सोमवारी (दि. १९) रात्री ११ वाजेच्या सुमारास यशवंत व्यायामशाळेजवळ लावलेला फलक मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजता अज्ञातांनी गायब केला होता. त्यानंतर पुन्हा दुपारनंतर हा फलक झळकला. दरम्यान, फलक कोणी गायब केला, यावरून देखील एकच चर्चा रंगली होती. काहींच्या मते, प्रकरण संवेदनशील असल्याने, पोलिसांनीच फलक काढला असावा, अशीही चर्चा रंगली होती. तर फलक काढला याचा अर्थ हनी ट्रॅप प्रकरणात तथ्य आहे? असा अंदाजही काहींनी बोलून दाखविला.