

नाशिक : राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा 'मास्टरमाइंड' हा नाशिकचाच असल्याचेच समोर आले आहे.
'हनी ट्रॅप'चा मास्टरमाइंड नाशिकचाच असून तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात याबाबतच्या तीन तक्रारी दाखल असून, नाशिकच्या पोलिस ठाण्यातदेखील एक तक्रार दाखल असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या या बड्या राजकारण्याने हनी ट्रॅपची 'राज' की बात सांगत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या ट्रॅपमध्ये राज्यातील तब्बल सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री अडकले असल्याचा दावा केला जात असतानाच, ठाणे गुन्हे शाखेकडे तीन आणि नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्याने प्रकरणाला काहीसे मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक अधिकारी, ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्या आहेत. तर नाशिकमध्ये दाखल तक्रार अधिकाऱ्याच्या पत्नीनेनेच केल्याची माहिती समोर आहे. दरम्यान, या चारही तक्रारींची पोलिसांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक करू नये, असे तक्रारदारांनी अगोदरच पोलिसांना सूचित केल्याने, पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्यामुळेच पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, याबाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे सांगितले. तसेच माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
नाशिकमध्ये कार्यरत असलेले व सध्या परजिल्ह्यात बदली होऊन गेलेल्या एका बड्या अधिकाऱ्याचाही हनी ट्रॅपमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्याकडे हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड असलेल्या व्यक्तीने तब्बल तीन कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे तणावात गेलेल्या या अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जेव्हा ही बाब त्याच्या पत्नीला कळाली तेव्हा तिने स्वत:हून समोर येत पोलिसात व्हिडिओसह तक्रार केल्याची माहिती समजत आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आजी-माजी मंत्री हे उत्तर महाराष्ट्रातीलच असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीत या मंत्र्यांचा नामोल्लेख असल्याचे समजते. मात्र, पोलिस याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नसून, त्यांच्याकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. दरम्यान, हे मंत्री नेमके कोण? याबाबत एकच चर्चा रंगत आहे.