Nashik Simhastha Kumbh | दोनशे वर्षांनंतर 13 आखाडे एकाच व्यासपीठावर

Nashik Simhastha Kumbh | चार जगद्गुरू, एका शंकराचार्यांचीही उपस्थिती : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत धर्मसत्ता, राजसत्तेचा संगम
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणासाठी तब्बल दोनशे वर्षांनंतर १३ आखाड्यांचे संत-महंत, चार जगद्गुरू आणि एक शंकराचार्य एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात हा दुर्मीळ योग अनुभवायस मिळणार असून, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा संगमही बघावयास मिळणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात ध्वजारोहण का केले जाते? जाणून घ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थातील 'या' परंपरेचे महत्त्व!

१७६० च्या नाशिक कुंभमेळ्यात रामकुंडावर अगोदर स्नान कोणी करायचे यावरून शैव संप्रदाय (शिवभक्त, नागा संन्यासी) आणि वैष्णव संप्रदाय (विष्णुभक्त, वैरागी साधू) यांच्यात रक्तांजित संघर्ष झाल्याचा इतिहास आहे. या रक्तांजित संघर्षामुळे कुंभमेळ्याचे पावित्र्य अन् कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने अखेर १७८९-९० मध्ये मराठा साम्राज्याचे तत्कालीन पेशवे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक ऐतिहासिक फर्मान काढले.

त्यानुसार, वैष्णव आखाडे यांना नाशिकच्या रामकुंडावर स्नानाचा अधिकार देण्यात आला. तर, शैव आखाडे यांना नाशिकपासून सुमारे ३० किमी दूर असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर स्नानाचा अधिकार दिला गेला. तेव्हापासून या आखाड्यांचे प्रमुख संत-महंत एकदाही एकत्र आले नसल्याचा इतिहास आहे.

मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या सिंहस्थ महाआरतीसाठी हे १३ आखाड्यांचे संत-महंत तब्बल दोनशे वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. याशिवाय चार जगद्गुरू आणि एक शंकराचार्य यांची देखील व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे. धर्म सत्तेतील हा दुर्मीळ योग असून, यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीसह प्रशासनाकडून अतोनात प्रयत्न केले जात असल्याची माहितीही समोर येत आहे.

दुसऱ्यांदा रक्तांजित संघर्ष

पेशव्यांच्या निवाड्यानंतरही काही दशकांनी, म्हणजेच साधारण १८२५ च्या सुमारास (सुमारे २०० वर्षांपूर्वी) त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा एकदा स्नानाच्या क्रमावरून आणि मिरवणुकीच्या मार्गावरून आखाड्यांमध्ये तलवारबाजी झाली होती. त्यातही मोठी जीवितहानी झाली होती. त्यानंतर ब्रिटिश राजवटीतही (१८८० च्या दशकात) आखाड्यांचे स्नानाचे क्रम आणि नियम अधिक कडक करण्यात आले, जेणेकरून पुन्हा रक्तपात होणार नाही.

Simhastha Kumbh Mela Nashik
Palghar Trimbakeshwar Road: पालघर ते नाशिक प्रवास होणार जलद!दिवाळीनंतर कामाला सुरुवात

गिनीज रेकॉर्डचे राष्ट्रपतींच्या हस्ते सर्टिफिकेट

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या दिवशी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तब्बल साडेसहा हजार महिलांकडून गोदावरीची महाआरती केली जाणार आहे. तत्पूर्वी दुपारी १ वाजता आरतीची रंगीत तालीम केली जाणार असून, दुपारी ४ वाजता गिनीज रेकॉर्डसाठी आरती केली जाणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ६ वाजता, म्हणजेच अवघ्या दोन तासांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला' रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्याचा प्रसंग भारताच्या इतिहासात पहिलाच असेल, असाही दावा केला जात आहे. यापूर्वी ३ हजार ८०० महिलांनी आरती केल्याचा परदेशी विक्रम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.