

नाशिक : बदलापूर येथील कथित स्त्रीबीज तस्करी प्रकरणाशी संबंधित गोविंदनगर येथील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द झाल्यानंतर तेथे साठवून ठेवलेल्या २४ गोठवलेल्या भ्रुणांबाबत (एम्ब्रीओ) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने संबंधित जोडप्यांच्या संमतीने हे भ्रूण त्यांच्या पसंतीच्या अन्य अधिकृत आयव्हीएफ केंद्रांमध्ये हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भ्रुणांची सुरक्षितता आणि नियंत्रण वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मार्च महिन्यात उघडकीस आलेल्या बदलापूर येथील कथित स्त्रीबीज तस्करी प्रकरणात गोविंदनगर येथील मालती आयव्हीएफ सेंटरचा संबंध असल्याचे समोर आले होते.
नाशिक महापालिकेकडून मिळालेल्या नोंदणी परवान्याचा वापर बदलापूर येथे केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केंद्रावर कारवाई करत ते सील केले आणि संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर केंद्राची नोंदणीही रद्द केली. महापालिकेच्या कारवाईविरोधात मालती आयव्हीएफ सेंटरने आरोग्यमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. मात्र सुनावणीनंतर महापालिकेची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने केंद्रामध्ये साठवून ठेवलेल्या २४ गोठवलेल्या भ्रूणांचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांना अन्य अधिकृत आयव्हीएफ केंद्रात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. मात्र ही प्रक्रिया संबंधित जोडप्यांच्या लेखी संमतीनंतरच राबवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय विभागाने हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली असून, भ्रूणांची तपासणी केली आहे. तसेच संबंधित केंद्राला न्यायालयीन आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली हस्तांतरण
न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय विभाग संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार असून, भ्रुणांची सुरक्षितता, हस्तांतरण आणि त्याची नोंद याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित केंद्रावर निश्चित केली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या जोडप्यांच्या हिताचे संरक्षण करण्यावर भर दिला जाणार आहे.