

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील रस्ते जलमय झाले, नाले तुंबल्याने पाणी घरांमध्ये शिरले, तर खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनाही घडल्या. जेल रोड नांदूरनाका मार्गावरील कुंभमेळ्याच्या कामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्यात नीलकंठेश्वर मंदिरासमोर एक अवजड मालवाहू ट्रक अडकला.
ट्रक बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तीन जेसीबी आणि एका हायवाची मदत घ्यावी लागली. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली. या काळात जेल रोड ते नांदूरनाका मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच परिसरातील अनेक झाडे रस्त्यावर पडली होती. रविवारीही एक पिकअप वाहन याच ठिकाणी अडकले होते. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता आणखी वाढल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे.
जेलरोड, नांदूरनाका आणि नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. जय भवानी रोड परिसरात नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. वालदेवी नदीतून मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून आल्याने नदीकाठावरील झाडांमध्ये कचरा अडकून राहिल्याचे चित्र दिसून आले. अनेक भागांतील ड्रेनेज व्यवस्था ठप्प झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.
देवळालीत माउली बंधारा ओव्हरफ्लो, लोहशिंगवेचा संपर्क तुटला
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून सतत चालू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला असून, लष्करी हद्दीतून येणारे पाणी यामुळे लोहशिंगवे गावातील मळे भागाकडच्या माउली बंधारा परिसराला पुराचा वेढा बसला. परिणामी दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, शालेय विद्यार्थी यांचा गावाशी व शहराशी तुटला आहे नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गाव डोंगरे व लष्करी आस्थापना यांनी वेढलेले आहे.
येथील पाणी साठवण करण्यासाठी माउली बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु मोरी नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. दुग्धव्यावसायिकांना आपले दूध शहरात नेता येत नाही. या काळात जर कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जाता येत नाही. त्यासाठी माउली बांधाऱ्यावर मोरी बांधण्याची मागणी लोहशिंगवेचे ग्रामपंचायत सदस्य युवराज जुन्द्रे, गोरख पाटोळे, चेतन गंधे, सुनील पाटोळे, वैभव गंधे, लखन पाटोळे यांनी केली आहे.
नानेगावात शिरले पाणी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाकडच्या गावांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. नानेगाव येथे गोविंद आडके व सुखदेव आडके यांच्या घरामध्ये पाणी शिरले, गाव व परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वांना सतर्कतेचा इशारा देत जेसीबीच्या साह्याने नाल्यांद्वारे पाणी काढून पुराच्या पाण्याचा निचरा केला. नानेगाव येथे दारणा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने गावात पाणी शिरले. गोविंद आडके व सुखदेव आडके यांच्या घरात व गोठ्याला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत पुराच्या पाण्याचा निचरा करत संभाव्य संकट टाळले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचे सर्व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाराम शिंदे आदींनी पुढाकार घेत जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांमधून पाण्याला मार्ग करून दिला. गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असल्याने लहान बालके व वयोवृद्ध नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
नियोजनाअभावी पाणी घरात
रेस्ट कॅम्प रोडचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर रस्त्यावरील जमा होणारे पाणी जाण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागत आहे. रेणुका माता मंदिर परिसरातील जमा होणारे पाणी कासार मळ्यातून स्नेहनगरमध्ये घुसले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्नेहनगरमधील अमोल गोडसे यांच्या घरात पाण्याचे लोंढे घुसले. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून येथील नागरिकांना सुविधा पुरवाव्यात आणि संकट टाळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके यांनी केली आहे