Chandwad Rain Update | चांदवड, नांदगावला वरुणराजाची जोरदार हजेरी

Chandwad Rain Update | शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण; नागरिकांना दिलासा
Rain In Western Region
Western Region RainFile Photo
Published on
Updated on

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यात अखेर सोमवारी (दि. २२) वरुणराजाने जोरदार हजेरी लावत शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, खरीप हंगामातील शेतीकामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

Rain In Western Region
Pune Monsoon Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; अनेक भागांत पाणी साचले, नागरिकांना दिलासा

मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर शेतकऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग येणार असून, खरीप हंगामाची सुरुवात उत्साहात होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पहिल्याच पावसाचा आनंद चिमुकल्यांनी मनमुराद लुटला.

शहरातील रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये मुलांनी पावसात भिजत आनंद व्यक्त केला. दुसरीकडे, चांदवडच्या सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आलेले शेतकरी, व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिकांची पावसामुळे मोठी धावपळ उडाली होती. साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अनेकांची धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली उष्णतेची लाट कमी झाली असून, वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाळा व उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्याच दमदार पावसाने शहरातील नाले व गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या. काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला. शहरातील पावसाळापूर्व स्वच्छतेच्या कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकूणच, वरुणराजाच्या जोरदार आगमनाने चांदवड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामाला चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rain In Western Region
Satara Water Scarcity : माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

नांदगावला एक तास बरसला

नांदगाव : पावसाळ्याला सुरुवात होऊन अनेक दिवस उलटूनही पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या नांदगाव परिसरात सोमवारी (दि. २२) दुपारी पावसाने हजेरी लावली. साधारण तासभर झालेल्या या पावसामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता.

सोमवारी दुपारनंतर अचानक आभाळ भरून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस बरसल्यामुळे शेतशिवारात पाणी साचले. या पावसामुळे जमिनीला ओलावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही उकाड्यापासून सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, पेरणीयोग्य जोरदार पावसासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news