हॅपी फादर्स डे | …कारण तो मुलाला घडवणारा ‘बाप माणूस’ असतो

हॅपी फादर्स डे | …कारण तो मुलाला घडवणारा ‘बाप माणूस’ असतो

[author title="नाशिक : निल कुलकर्णी" image="http://"][/author]
आईपणाची थोरवी जगात निर्विवाद मोठी आहेच. परंतु वडिलांचे मुलांसाठी अपार कष्ट, मेहनत, त्यागही तितकाच मोठा असतो. आईच्या वात्सल्याबरोबरच वडिलांचेही कर्तृत्वही अनमोल असते. वडिलांचा त्याग, मुलांच्या भवितव्यासाठी पोटाला चिमटा काढून भरलेली फी, त्याग, प्रेम मुलांसाठी आभाळमाया ठरते. मुलांसाठी कष्ट वेचणार्‍या 'बाप माणसाच्या' अशा त्यागाच्या कहाण्या बापाचे काळीज किती मोठे असते याची साक्ष देतात.

सिन्नर तालुक्यातील पास्ते या छोट्या गावात गणेश आव्हाड यांनी आपल्या मुलाच्या-प्रसादच्या- हातात चित्रकला, शिल्पकलेतील गुण पाहून त्याला मोठा आर्टिस्ट करण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी पित्याने प्रारंभी छोटी पानटपरी आणि नंतर दूध व्यवसाय करून मुलाच्या कलेला प्रोत्साहन दिले. कोविड काळानंतर टपरी बंद पडल्याने आर्थिक संकट कोेसळले. गणेश आव्हाड यांनी प्रसादला त्याची झळ बसू दिली नाही. तू चित्राचा सराव सुरू ठेव, पैशाचे मी बघतो, असे वडिलांनी मुलाला सांगितले. प्रतिकूल काळात त्यांनी स्वत:साठी कपडेही शिवले नाहीत. परंतु प्रसादला चित्र साहित्य आणून देत गेले. प्रसादने चित्राचा सराव सुरूच ठेवला. त्याने या काळात चितारलेली निसर्गचित्रे अमेरिकेत विकून वडिलांवर कोविड काळात वाढलेले कर्ज फेडले. मिळालेल्या पैशातून वडिलांना गोठा बांधण्यासह पैसे दिले. आज जगातील पहिला गोठ्यातला स्टुडिओ पास्ते गावी उभा आहे. प्रसाद सध्या पुण्यात कलेचे उच्च शिक्षण घेत आहे. वडिलांना आजारपणातून बाहेर काढून प्रसाद वडिलांच्या पाठीशी ठाम उभा आहे. वडिलांची बंद टपरी प्रसादने पुन्हा सुरू करत त्यांच्या आयुष्याचा प्रवास पुढे सुरू ठेवला आहे.

मुलांमुळेच मोठे होते 'बापाचे' नाव

आपली मुले आपले भविष्य असतात. मुले शिकली. कर्तृत्ववान निघाली की, मुलांमुळे बापाचे नाव होते. मुलाला जगातील सर्वात मोठा कलावंत झालेला पाहायचे आहे. मुलांच्या सुखाकरिता आणि त्यांच्या करिअरची उभारणी करण्यासाठी केलेल्या संघर्षाचे फलित तो चित्रकार झाल्यानंतर मिळणार ही आशा आहे. – गणेश आव्हाड, टपरीधारक, दुग्ध व्यावसायिक.

गणेश आव्हाड हे पानटपरी चालवण्याबरोबरच दूधविक्री करतात. दोन मुलींचे लग्न केल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीत मुलाचा कल ओळखून त्याला त्यातच शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. माझा संघर्ष, त्याग मुलाला मोठा कलावंत केल्यानंतर थांबेल, असे भावपूर्ण उद्गार गणेश आव्हाड बोलून दाखवतात. तर वडिलांचा त्याग, आभाळमाया आम्ही कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया मुले देतात. मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पिता सर्वस्व पणाला लावतो… कारण तो 'बाप माणूस' असतो.

माझे वडील सुपर हिरोच..!

बालपणापासूनच माझ्यातील चित्रकलेची आवड पाहून वडील नेहमी मला चित्रकलेचा क्लास लावायाला हवा, असे म्हणत असत. ते स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांनी आमच्यातील कलागुण ओळखून आम्हाला त्यातच करिअरसाठी प्रोत्साहन दिले. बहिणीची संगीत आवड पाहून तिला विशारद केले. गोठ्यातच सरावासाठी मी खोली उभारली आणि आज त्याचे आर्ट स्टुडिओत रूपांतर झाले आहे. अमेरिकेत चित्र विकून वडिलांना आर्थिक मदत केली. वडील माझ्यासाठी सुपर हिरो आहे. -प्रसाद आव्हाड, उगवता चित्रकार, पास्ते, सिन्नर.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news