

पुढारी ऑनलाइन डेस्क | पुणे आणि सोलापुरात कहर करणाऱ्या जीबीएसचा नाशिक शहरातही शिरकाव झाला आहे. नाशिक शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. एक ६० वर्षीय नागरिक जीबीएस बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे नाशिककरांना आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
जीबीएस बाधित नागरिक हा नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील रहिवासी आहे.
जीबीएस बाधित रुग्णावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यात जीबीएससदृश आजाराची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे या रुग्णास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णाचे नमुने तसेच आश्रमशाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.