

ठळक मुद्दे
नाशिककरांचा दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीचा धडाका
विविध शोरुम्समदून सुमारे १०० ते १२० कोटी रुपयांची उलाढाल
देशभरात वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नव्या दरांची अंमलबजावणीचा परिणाम
नाशिक: नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच लागू झालेल्या जीएसटी कपातीचा नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीचा धडाका लावला. दिवसभरातील वाहनांच्या विविध शोरुम्समदून सुमारे १०० ते १२० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विविध शोरुम चालकांनी दिली. यात दुचाकीची सुमारे ५० कोटी तर कार आणि अन्य चार चाकी खरेदीतून ७० कोटी रुपयांची उलाढाल झाली.
मोटारसायकलींपासून चारचाकीपर्यंतच्या विक्रीत तब्बल १५ टक्के वाढ झाली आहे. एका चारचाकी शोरूममधूनच दिवसभरात २२ कार विकल्या गेल्या. विक्रीचा हा आकडा पाहता एकट्या नाशिक शहरात १०० ते १२० कोटींची उलाढाल झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला असता २०० ते २५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज असून येत्या २ ते ३ दिवसात हे चित्र स्पष्ट होईल .
देशभरात वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नव्या दरांची अंमलबजावणी नवरात्राच्या पहिल्या दिवशी सोमवारपासून करण्यात आली. नव्या दरांमुळे दैनंदिन वापरातील वस्तूंसह वाहनांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वदेशी उत्पादनांना चालना मिळेल तसेच सर्वसामान्य ग्राहकांचा ताण कमी होईल, असा व्यापारी वर्गाचा विश्वास आहे. विक्रेत्यांच्या मते, नवरात्राच्या शुभमुहूर्तावर नाशिकमध्येच सुमारे १२० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. वाहन खरेदीसाठी तरुणाईत विशेष उत्साह दिसला. ग्राहक व व्यापारी दोघेही समाधानी असून नवरात्राची सुरुवात उत्साहपूर्ण झाली आहे.
"जीएसटी कपातीमुळे वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता खूप आनंद झाला. सणासुदीमुळे वाहन खरेगीला वेग मिळेल."
विलास देसले, व्यावसायिक