

रत्नागिरी : केंद्र सरकारने दसरा, दिवाळी सणापूर्वीच जीएसटी कपातीच्या रूपात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. 22 सप्टेंबरपासून देशभरात जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहे. त्यामुळे वाहनखरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरे खरेदी, दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होणार आहेत. यामुळे सणांसाठी खरेदी करणे सर्वसामान्यांना आधीच्या तुलनेत स्वस्त होणार आहे.
केंद्र सरकारने सणापूर्वीच जीएसटीमध्ये बदल केल्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होणार आहे. त्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसाठी आतापासूनच बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. काहीठिकाणी झुंबड पहावयास मिळत असून एक महिना वेटिंग येत आहे तर काही ठिकाणी सोमवारीच बुकिंग होणार असल्याचे सांगण्यात आले. दुचाकी, तीनचाकी, चारचाकीचे कर 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत केल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक वाहनात अंदाजे 10 ते 15 हजारांची बचत होणार आहे.
तसेच बांधकाम साहित्याची सिमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर इतर बांधकाम साहित्यावरील जीएसटी करही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन जीएसटी कर रचना लागू झाल्यास बांधकाम साहित्यात घट होवून बांधकाम शुल्क होईल त्यामुळे घरेही स्वस्त होणार आहेत. दिवाळी, दसरा, पाडव्यासाठी मोठ्या प्रमाणात रो हाऊस, अपार्टमेंटची बुकिंग होण्याची शक्यता आहे. तसेच सणासुदीत दुग्धजन्य पदार्थात बटर, चीज, तूपचे कर 15 वरून 5 टक्के करण्यात आले आहे तर पनीरवरील कर शून्य करण्यात आले. त्यामुळे सणासुदीत गोडधोड बनवण्यासाठी लागणारे साहित्य किंमती कमी होणार आहे. एकंदरीत, उद्या सोमवारपासून जीएसटीत कपात केल्यामुळे विविध क्षेत्रातील कर रचनेत बदल होणार आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे.