

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
करिअर, शिक्षण, आर्थिक स्थैर्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे मातृत्व पुढे ढकलणाऱ्या महिलांमध्ये एग फ्रीजिंगकडे पाहण्याचा कल वाढताना दिसत आहे. वय वाढत असताना, स्त्रीबीजांची अर्थात अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे भविष्यात गर्भधारणेची इच्छा असल्यास, तुलनेने कमी वयात अंडी गोठवून ठेवण्याचा पर्याय काही महिलांसाठी उपयुक्त ठरू शकतो, अशी माहिती प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगावकर यांनी दिली.
महिलांची फर्टिलिटी वयानुसार बदलत जाते. विशेषतः ३५ वर्षांनंतर अंड्यांच्या गुणवत्तेत होणारी घट अधिक वेगाने होऊ शकते. एग फ्रीजिंगच्या माध्यमातून भविष्यासाठी अंडी संरक्षित ठेवता येतात. मात्र हा पर्याय प्रत्येक महिलेसाठी आवश्यक किंवा हमखास गर्भधारणेची हमी देणारा नाही. महिलेचे वय, अंड्यांची संख्या, आरोग्य आणि भविष्यातील गर्भधारणेच्या नियोजनानुसार त्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. मळगावकर यांनी स्पष्ट केले.
एग फ्रीजिंग प्रक्रियेत काही दिवस हार्मोनल औषधांच्या मदतीने अंडाशयातील अंड्यांची वाढ केली जाते. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेद्वारे परिपक्व अंडी मिळवून ती अत्यंत कमी तापमानात गोठवून संरक्षित केली जातात.
भविष्यात गर्भधारणेची गरज भासल्यास ही अंडी वितळवून त्यांचा वापर सहायक प्रजनन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. मात्र अंडी गोठवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये एग फ्रीजिंगसह विविध फर्टिलिटीविषयक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध आहे.
मातृत्व पुढे ढकलण्याचा निर्णय घेताना महिलांनी केवळ सामाजिक किंवा वैयक्तिक कारणांचा विचार न करता, फर्टिलिटीतील वयाशी संबंधित बदलांचीही माहिती घ्यावी. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास भविष्यातील पर्याय अधिक स्पष्टपणे समजून घेता येतात, असा सल्लाही डॉ. मळगावकर यांनी दिला.