

नांदगाव (नाशिक) : तालुक्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ८८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि. २८) दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास तसेच पंचायतराज विभागाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण काढण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या नव्या आदेशानुसार नांदगाव तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, तसेच महिलांसाठी ५० टक्के महिला सरपंचपदाच्या आरक्षणासाठी बुधवारी (दि. ३०) येवला येथील उपविभागीय कार्यालयात दुपारी १२ वाजता प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षण प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्याने ही फेरआरक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये अनुसूचित जाती - जमाती, इतर मागास वर्ग तसेच महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या पदांची नव्याने निश्चिती करण्यात येणार आहे.