

नाशिक : जागेच्या वादामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठालगतची प्रस्तावित जागा रद्द करत मेरी परिसरातील १२.७१ हे. जागेवर ४०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या प्रक्रियेला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. सुरुवातीला तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, ही जागा शहराच्या बाहेरील भागात असल्याने मेरी परिसरातील मध्यवर्ती जागेची मागणी आमदार राहुल ढिकले यांनी लावून धरली. मेरी परिसरातील महाविद्यालयामुळे पंचवटी, नाशिकरोडसह शहरातील विविध भागांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे.
शासनादेशानुसार नाशिक येथील सर्व्हे क्र. ११७मधील १२.७१ हे. जमीन महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी वापरण्याचा उल्लेख आहे. या ठिकाणी यापूर्वी उभारलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा, शक्य असल्यास, संस्थेच्या भविष्यातील बांधकामासाठी उपयोग करण्याची अटही नमूद करण्यात आली आहे. संबंधित जमीन वनक्षेत्रात येत नसल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन शासनाच्या नावावर करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबर १९९९ रोजी महसूलमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आवश्यकतेनुसार पुनर्विचार करण्याची तरतूदही आदेशात आहे. या निर्णयाला वित्त विभागाची २५ एप्रिलला सहमती मिळाल्याचे शासनादेशात नमूद असून, कक्ष अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी स्वाक्षरी केली आहे.
नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण, नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासन सहकार्य करत आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे २५ लाख नागरिकांना लाभ होईल. नाशिककर रुग्णांना चांगले उपचार मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
- अॅड. राहुल ढिकले, आमदार, भाजप