

ठळक मुद्दे
मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिककडे आता मोठ्या उद्योगांचा ओढा
हवाई आणि रस्ते कनेक्टिव्हिटीसह येथील सोयीसुविधा उद्योजकांना करतेय आकर्षित
सात मोठ्या उद्योगांचे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार
नाशिक : सतीश डोंगरे
मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणात तुलनेत औद्योगिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या नाशिककडे आता मोठ्या उद्योगांचा ओढा वाढत आहे. हवाई आणि रस्ते कनेक्टिव्हिटीसह येथील सोयीसुविधा उद्योजकांना आकर्षित करीत असून, त्याचेच फलित म्हणून मागील काही दिवसांत सात मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार राज्य शासनासाेबत केले आहेत. त्यातील पाच उद्योगांची गुंतवणूक तब्बल १६ हजार ९११ कोटी इतकी असून, त्यातून तब्बल ७ हजार ५६६ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
जगातील पाचव्या क्रमांकाच्या वाढवण बंदराचा सर्वाधिक फायदा पालघर आणि नाशिक जिल्ह्याला होणार आहे. समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणि इगतपुरी तालुक्यातील भरवीरमार्गे थेट वाढवणला जोडल्या जाणाऱ्या 'फ्रेट काॅरिडॉर'ची निर्मिती केली जाणार असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा उद्योग क्षेत्राला होणार आहे.
अशात नाशिकला गुंतवणूक फायदेशीर ठरणार असल्याने, मोठ्या समूहाच्या उद्योगांकडून गुंतवणुकीवर भर दिला जात आहे. रिलायन्स (४२०० कोटी) आणि इंडियन ऑइल (३५० कोटी) यासारख्या बड्या उद्योगांनी नाशिकच्या दिंडोरी येथे गुंतवणूक केल्यापासून उद्योजकांना नाशिक खुणावत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी महिंद्रा ॲण्ड महिंद्राने आपल्या यूव्ही प्रकल्पाची गुंतवणूक नाशिकला जाहीर केल्यानंतर पाठोपाठ गुंतवणुकीचे करार आणि गुंतवणूक नाशिकला घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील अडीच ते तीन वर्षांत नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी झळाळी मिळणार आहे.
नाशिक हा कृषिबहुल जिल्हा असून, येथील बहुतांश जमीन ही सुपीक आहे. त्यामुळे उद्योगांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे एमआयडीसी प्रशासनासमोर आव्हान आहे. सिन्नर तालुक्यातील सेझअंतर्गत इंडिया बूल्सची ५१२ हेक्टर जमीन परत घेण्यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्न केले जात असून, ही जमीन ताब्यात आल्यास नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एमआयडीसीकडून जमीन अधिगृहणाची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण सात मोठ्या उद्योगांसोबत गुंतवणुकीबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. याबाबत दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सीपीआरआय लॅबच्या उद्घाटन सोहळ्यात सांगितले आहे. यातील पाच कंपन्यांची नावे आणि त्यांची गुंतवणूक समोर आली असली तरी, दोन कंपन्यांबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यांची आकडेवारी समोर आल्यास, गुंतवणुकीचा आणि रोजगाराचा आकडा आणखी वाढणार आहे.
समृद्धी महामार्गाला नाशिकमधून तीन कनेक्ट देण्यात आले आहेत. सिन्नर, घोटी आणि इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथून कनेक्ट असल्याने, याचा उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.
सुरत-चैन्नई महामार्गाला सिन्नर येथून कनेक्ट देण्यात आल्याने, नाशिकला दक्षिणेतील राज्यांना जोडणे शक्य होणार आहे.
महिंद्रा ॲण्ड महिंद्रा
१० हजार कोटी - ५ हजार रोजगार
उत्पादन : इलेक्ट्रिक वाहने
(आडवण, पारदेवी, ता. इगतपुरी)
ग्राफाइट
४,७६१ कोटी - १,१६६ रोजगार
उत्पादन : सिंथेटिक ग्राफाइट ॲनोड मटेरियल
(मुंढेगाव, ता. इगतपूरी)
व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि.
८०० कोटी - ५०० रोजगार
उत्पादन : इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर कम्पोनंट्स
(दिंडोरी, नाशिक)
एपिरॉक एबी
३५० कोटी - २०० रोजगार
उत्पादन : खाण आणि बांधकाम उपकरण, आर ॲण्ड डी सुविधा, उत्पादन युनिट
(गोंदे, इगतपुरी, नाशिक)
पॅरासन मशिनरी प्रा. लि.
एक हजार कोटी - ७०० रोजगार
उत्पादन : लगदा आणि कागद यंत्रसामग्रीची
निर्मिती (दिंडोरी, नाशिक)
महिंद्रा ॲण्ड महिंद्राची गुंतवणूक आणण्यात यश आल्याने, इतर उद्योग समुहांचा नाशिककडे ओघ वाढतअ आहे. 'निमा'च्या माध्यमातून आपण सातत्याने नाशिकचे ब्रॅण्डिंग करीत आहोत. आता मुख्यमंत्री स्वत:च नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून नाशिकला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी मोठ्या उद्योग समुहांकडून नाशिकमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
आशिष नहार, अध्यक्ष, निमा.
नाशिकमध्ये मोठ्या उद्योग समुहाचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक असून, त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील आडवण, पारदेवी, मापारवाडी, माळेगाव, दिंडोरी आदी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध असून, इतर भागात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
दिपक पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.