

Nashik Travels Bus
नाशिक : द्वारका व मुंबई नाका परिसरात सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी तपोवनातील सिटीलिंकच्या बस टर्मिनलवर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी नाशिक बस ओनर्स ॲण्ड ऑपरेटर संघटनेला भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामाध्यमातून महापालिकेला प्रतिवर्षी २०.७२ लाखांचा महसूल मिळणार आहे.
नाशिक बस ओनर्स ॲन्ड ऑपरेटर संघटनेने बस थांब्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार पंचवटीतील तपोवनातील सिटीलिंक बस टर्मिनलमधील ४ हजार ३११ चौरस मीटर क्षेत्र चालू बाजारभावानुसार २.५० टक्के दराने जीएसटीसह भाडेतत्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. उच्च न्यायालयातील जनहित याचिकेतील अंतरीम आदेशानुसार महापालिकेतील मिळकती नाममात्र वा विनामोबदला दराने भाडेपट्ट्याने देऊ नये, असे निर्देश आहेत. त्यानुसार भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीच्या बैठकीत मिळकतीच्या मूल्यांकनाचे आधारभूत दर २.५० टक्के दराने देण्यास समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार मिळकतीच्या ४ हजार ३११ चौ. मी. क्षेत्रासाठी वार्षिक भाडे १७,५६,७३३ आणि १८ टक्के जीएसटी ३,१६,२१२ प्रमाणे एकूण वार्षिक २०,७२,९४४ इतके वार्षिक भाडेमूल्य ठरवण्यात आले आहे. संघटनेने भाडेमूल्य भरण्यास संमती दिल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
नाशिक बस ओनर्स ॲण्ड ऑपरेटर संघटनेकडून तीन महिन्याच्या आगाऊ भाड्याची रक्कम सुरक्षा अनामत म्हणून घेतली जाणार आहे. भाडेकरारनामा करण्यात येणार आहे. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत ही मिळकत महापालिकेच्या वापरासाठी मोकळी करुन द्यावी लागणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीवर तोडगा
द्वारका आणि मुंबई नाका या दोन्ही ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांकडून या परिसरात प्रामुख्याने सर्व्हिसरोडवर बसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. आता, या बसेसना तपोवनात थांबा मिळाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.