

नाशिक : घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मविप्र आयटीआय आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांनी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. मविप्र आयटीआयमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील विविध प्रकारचे कोर्स मोफत सुरु करण्यात आले आहेत.
ऑटोमोटिव्ह कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह सेवा तंत्रज्ञ टू व्हीलर, ऑटोमोटिव्ह सेवा तंत्रज्ञ फोर व्हीलर, ऑटोमोटिव्ह सेवा सल्लागार टू व्हीलर व फोर व्हीलर आदी प्रकारचे रोजगाराभिमुख कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. याप्रसंगी बॉश इंडिया फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर अजय आखरे, डॉ. परशुराम काळे, मविप्र आयटीआयचे प्राचार्य आर. बी. पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान इलेक्ट्रिक वाहनांचे भाग (उदा. बॅटरी, मोटर, कंट्रोलर) आणि चार्जिंग प्रणालीबद्दल प्रशिक्षण मिळणार आहे.