

नाशिक : भारताने २०११ ते २०२५ या पंधरा वर्षांदरम्यान अंदाजे १२,६७० टन सोन्याच्या आयातीसाठी तब्बल ६०९ अब्ज डॉलर इतके विदेशी चलन खर्च केले. परंतु सोन्याच्या दराने घेतलेल्या उसळीचा फायदा आयात सोन्याला झाला आहे. या आयातीत सोन्याचे मूल्य प्रतिऔंस ४,६७७ डॉलर्स या दरानुसार आता अंदाजे १.९०५ ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर इतके झालेले आहे. यातील केवळ १.३ ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती ही भारताच्या एकूण परकीय चलनसाठ्यापेक्षाही अधिक आहे. या काळात अन्य कोणत्याही वित्तीय मालमत्तेने, सरकारी योजनेने अथवा आर्थिक योजनेने भारतीय कुटुंबांसाठी इतक्या विशाल प्रमाणात संपत्तीची निर्मिती केलेली नाही.
आर्थिक धोरणांची आखणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोन्याकडे पिढ्यान्पपिढ्या नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलेले आहे. सोने आयात म्हणजे परकीय चलनाचा -हास आहे. पण त्यांची ही धारणा चुकीची ठरली आहे. भारतीयांची जी सवय त्यांना देशाच्या डोक्यावरील आर्थिक दायित्व वाटत होते, तीच सवय प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या इतिहासात घरगुती पातळीवर संपत्तीनिर्मितीची सर्वाधिक मोठी कृती ठरली आहे. सोने आयातीचे वर्षनिहाय विश्लेषण केले असता सोन्यामुळे अतिशय अवाढव्य प्रमाणात संपत्तीनिर्मिती झाली आहे.
२०१५ मध्ये ३५ अब्ज डॉलर्स खर्चुन आयात केलेल्या सोन्याचे मूल्य आज १५७अब्ज डॉलर झाले आहे. मूल्यात तब्बल ३५० टक्के वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ३२ अब्ज डॉलर्स खर्चुन आयात केलेल्या सोन्याचे मूल्य आता चौपट होऊन ते १४२ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. अगदी २०२० मधील कोविड महामारीच्या वर्षात, भारताने तब्बल २२ अब्ज डॉलर्स खर्चुन ४३० टन सोने आयात केले होते. या सोन्याचे मूल्य आजच्या दरानुसार ६५ अब्ज डॉलर्स झाले आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य आजच्या घडीला किमान दुप्पट झालेले नाही, असे २०११ ते २०२५ दरम्यानचे एकही वर्ष सापडणार नाही. दरवर्षी सोन्याचे मूल्य वाढतच गेलेले आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी आर्थिक मालमत्ता २०२५ मध्ये सोन्याने धुवाधार कामगिरी अधिकृत नोंदीबाहेरचा वास्तविक साठा १.९ ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्सचा हा आकडा केवळ २०११ पासून आयात केलेल्या सोन्याचा आहे. पिढ्यान्पिढ्या घराघरांत साठवलेला सोन्याचा साठा त्याहूनही मोठा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार, भारतीय कुटुंबांकडे २५,००० ते ३४,६०० टन सोन्याचा साठा आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे याचे मूल्य ३.८ ट्रिलियन ते ५.२ ट्रिलियन डॉलर्सदरम्यान असावे, असा अंदाज आहे. हे मूल्य ढोबळमानाने भारताच्या जीडीपीबरोबरचे आहे.
गिफ्ट सिटीच्या माध्यमातून गुंतवणूक संधी
भारतीय गुंतवणूकदारांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत आणि परकीय चलनात व्यवहार करणाऱ्या माध्यमाआधारे सोन्यात गुंतवणुकीचा व्यावहारिक मार्ग उपलब्ध नव्हता. आता, आयएफएससीएने (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण) केलेल्या नियमांमधील बदलांमुळे अनिवासी भारतीय आणि निवासी भारतीयांसाठी गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग खुले आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणुकीची इच्छा असणारे गुंतवणूकदार तसेच परकीय परतावा हवा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मत अर्थ भारत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आयएफएससी एलएलपीचे व्यवस्थापकीय भागीदार सचिन सावरीकर यांनी मांडले. गिफ्ट सिटीतील गुंतवणूक सुविधेमुळे सोन्याचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होणार आहे. हे केंद्र दुबई, सिंगापूर, हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रांना झपाट्याने पर्याय म्हणून पुढे येत आहे.